भव्य शोभायात्रा, मिरवणूक आणि प्रचंड उत्साहात संगमनेरध्ये साजरी झाली रामनवमी

0
1634

प्रमुख आकर्षण असलेल्या महाकाल अघोरी तांडव हा जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांची शहर व तालुक्यातून अफाट गर्दी

युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी)
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहिल्यानंतर बुधवारी (दि.17) पहिलीच श्रीरामनवमी संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली. संगमनेर शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात सगळीकडे श्रीरामनवमीचा उत्सव ल जल्लोष पाहायला मिळाला. शहरातील चंद्रशेखर चौक, अभिनवनगर, पंजाबी कॉलनी येथील श्रीराम मंदिर आणि इतरही मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी शहरात भव्य अशी लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली.
चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी संपूर्ण देशात श्रीराम जन्म सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतो. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहिल्यानंतर यावर्षीही प्रथमच साजर्‍या होणार्‍या श्रीराम जन्मोत्सवासाठी सर्व राम मंदिरे सजलेली पाहायला मिळाली. मंदिरात मूर्तीला अभिषेक करून धार्मिक ग्रंथांचे पठण करण्यात आले.


श्रीरामनवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने संगमनेर शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई चौघडे, पारंपरिक वाद्य ढोल ताशा पथक, भजनी मंडळ, महिलांसाठी स्वतंत्र डि.जे. व तरुणांसाठी विद्युत रोषणाई केलेला डि.जे. होता. तामिळनाडूतल्या कोईंबतूर इथे असलेल्या शिवाच्या 112 फूट उंच भव्य आदियोगी मुर्ती प्रतिकृती व अयोध्येतील प्रतिष्ठापना केलेल्या श्रीरामलल्ला मूर्तीची 12 फूट प्रतिकृर्ती अत्यंत सुंदरपणे सजवलेली होती. त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नवीन नगर रोड, बस स्थानक, छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा, पंजाबी कॉलनी, अशोक चौक, चावडी, मेनरोड, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक या शोभायात्रेच्या मिरवणूक मार्गावर रांगोळी व पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे जलोष्यात स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.


या शोभायात्रेत प्रमुख आकर्षण असलेल्या महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा जिवंत देखावा पाहण्यासाठी अबाल वृद्ध, बाल गोपाळांसह महिलांची शहर व तालुक्यातून अफाट गर्दी झाली होती. महाकाल यांचा तिरसा डोळ्या उघडल्यानंतरचे आक्रमक रूप व अघोरींचे नृत्य संगमनेरकरांनी काल पहिल्यांदा पाहिले. संगमनेर शहरातील सर्व रस्ते दुतर्फा गर्दीने भरले होते. नवीन नगर रोड येथून सुरू झालेली मिरवणूक रात्री 10 वाजेच्या दरम्यान चंद्रशेखर चौकात आली. महाआरती होवून मिरवणुकीची सांगता झाली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या संगमनेरकरांचे बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर व शुभम कपीले यांनी आभार मानले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पो. नि. भगवान मथुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here