
तथाकथित पत्रकार महिलेवर अखेर खंडणीचा गुन्हा दाखल
बदनामीची भीती दाखवून पाच लाख वसूलीचा प्रयत्न
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका तथाकथित पत्रकार महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याआधी या तथाकथित महिला पत्रकाराची काही महिलांनीच येथेच्छ धूलाई देखील केली. त्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा शहरात होत आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी) अशी खंडणी मागणार्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखील या तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून त्याबदल्यात सामाजिक कार्यकर्त्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
त्यानंतर या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा झाली. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याने संतापलेल्या सदर तरुणीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आत्महत्या करायला निघालेल्या या पीडित महिलेसोबत महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या.
सदर विवाहित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार मारूती राऊत रा. घुलेवाडी, गोविंद राम नागरे रा. नेहरू चौक व कृष्णा अजित सारडा रा. अशोक चौक संगमनेर या तिघांविरुद्ध गु.र.नं. 46/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 356(2),308(2),308 (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आह
बाजारू व पोटभरू पत्रकारांना इशारा
पत्रकारितेस सामाजिक प्रभाव व प्रतिष्ठा असल्याने काही बाजारू व पोटभरू व्यक्ती पत्रकारितेच्या नावाने अवैध उद्योग तसेच ब्लॅकमेलिंग करीत असल्याने त्यांनी पत्रकारितेस बदनाम केले आहे. अलिकडेच युट्यूबच्या माध्यमातून पत्रकारितेचा गंधही नसलेले संपादक, पत्रकार काँग्रेस गवता प्रमाणे निर्माण होत आहेत. त्यामुळे समाजात व प्रशासनात पत्रकारांना अधिकृत कोण व बोगस कोण ओळखणे अडचणीचे होत आहे. कोणत्याही व्यक्तीने पत्रकार म्हणून ओळख करून दिल्यास त्याची अधिकृ
तता तपासून घ्यावी असे आवाहन संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेने केले आहे.
ब्लॅकमेलिंगच्या पार्श्वभूमीमुळे
आणखी प्रकरणे बाहेर येणार?
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेली कृष्णा सारडा ही महिला स्वतःला पत्रकार म्हणून घेत युट्युबवर चॅनल चालवते. या अगोदर अनेक प्रकरणांत तीचे नाव घेतले जात होते. या खंडणी मागणार्यांमध्ये देखील तिचे नाव असल्याने शहरातील महिला पोलीस ठाण्यात जमा झाल्या. त्यानंतर या संतप्त महिला सारडा हिच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी गेल्या असता ती तेथे त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे त्या पुन्हा पोलिस ठाण्यात आल्या. तेथे कृष्णा सारडा ही आल्यावर या संतप्त महिलांनी तेथेच तीला चांगला चोप दिला. या प्रकारानंतर शहरातील अनेक ब्लॅकमेलिंगची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून आज पुन्हा काही गुन्हे दाखल होतील अशी चर्चा आहे. कृष्णा सारडा हिने यापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याबदल्यात पैशांची देखील मागणी केल्याच्या चर्चा गावात होत होत्या.