संगमनेर बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

0
114

पुण्यातील घटनेने महाराष्ट्र हदरला, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे

संगमनेरचे वैभव असणारे बसस्थानक नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. बेशिस्त पार्किंग, टावाळखोरी, हाणामारी, चोरी, अस्वच्छता हे जणू येथील नित्याचेच बनले आहे. रात्रीच्यावेळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना या ठिकाणी असल्याचे दिसत नाही. भिकारी, शरीर विक्री करणार्‍या महिला, चोर यांची तर याठिकाणी युती असल्याचे दिसते. प्रवाश्यांना जीव मुठीत धरून या ठिकाणी वावरावे लागते. त्यामुळे उच्च दर्जाचे सीसीटिव्ही, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, पोलीसांची गस्त अशा उपाय योजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)- संगमनेर- पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात रात्रीच्या वेळी एका मुलीवर आरोपीने दोनदा अत्याचार केल्याची घटना घडली आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेमुळे पुण्यासह सर्वच बसस्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
संगमनेरातील भव्यदिव्य बसस्थानक मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासले असताना आता येथील प्रवासी आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न देखील गंभीर बनला आहे. रामभरोसे सुरक्षा असलेल्या या बसस्थानकयाबाबत एसटी प्रशासनाने सजग व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे. पुणे येथील एसटी बसस्थानकात एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महामंडळाची सर्वच यंत्रणा खडबडून जागी झाली आणि विविध बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेबाबत होणारी हेळसांड समोर आली. बहुतेक बसस्थानकांमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी कुत्री, डुकरांचा वावर प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. रात्री उतरलेल्या प्रवाशांना सुरक्षेची हमी नाही.

हलक्या दर्जाचे सिसिटीव्ही, पुरेशी विजेची सोय आणि सुरक्षा रक्षकांचा अभाव अशा परिस्थितीत प्रवाशी याठिकाणी वावर करतात. या बसस्थानकातून नाशिक, पुणे, मुंबई, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड या मार्गासह परराज्यात देखील बस धावतात. पहाटे एकच्या नंतर स्थानकात शुकशुकाट असतो. काही लांब पल्ल्याच्या बस स्थानकाच्या बाहेर रस्त्यावर उभ्या करून प्रवाशांना सोडतात. रिक्षात बसण्यावरून अनेकदा प्रवाशांची ओढातान होताना दिसते. मुक्कामी बस सीसीटीव्हीच्या कक्षेबाहेर झाडाखाली अंधारात उभ्या केल्या जातात. त्याचे दरवाजे खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असतात. बसस्थानक परिसरात अनेकदा रात्री युवकांच्या टोळ्यांमध्ये भांडणे झाल्याचे दिसून येतात. अशा परिस्थितीत महिला प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते. रात्री स्थानकांच्या परिसरात अंधार असल्याने प्रवाशांना भीतीचे वातावरण तयार होते. बसस्थानकात अनेकदा चोर्‍या होतात. याबाबत स्थानिक पोलिस चौकीत अनेकदा तक्रारी होतात, त्याची दखल मात्र घेतली जात नसल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
गेल्या काही दिवसात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना समोर येत असतांना आता बसस्थानक आवारात असे प्रकार होऊ लागल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. संगमनेर बसस्थानकात भिकार्‍यांचा मोठा वावर, चोरांची टोळी, अस्वच्छता, बेशिस्त पार्किंग, निकृष्ठ दर्जेचे सीसीटिव्ही, अनेक गाड्यांची दुरावस्था असे असंख्य प्रश्‍न असतांना आता थेट प्रवाशांच्या सुरक्षेचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहे. बसस्थानक आवारात रात्रीच्यावेळी खासगी वाहने आडबाजूला लावलेली असतात, आडबाजूला लावलेल्या बसमध्येही नेमके काय चालते ही तपसणारी यंत्रणा नाही. त्यामुळे उद्या पुण्यासारखा एखादा प्रसंग घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्‍न या निमित्ताने समोर आला आहे. आगार व्यवस्थापकांनी व पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून प्रवाशांच्या, महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here