
शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
आर्थिक लाभापायी सुभाष गुलाब म्हेत्रे व अविनाश सुभाष म्हेत्रे दोघे (रा. सेंटमेरी शाळा पाठीमागे) यांनी कत्तलखाना चालकांना त्यांच्या मालकीची जमिन सर्व्हे नं. 192/193 वापरण्यास दिली. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. याप्रकरणी वरील दोघा जणांवर शहर पोलीस ठाण्यात रजि नं. 154 नुसार विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील अवैध कत्तलखान्यातून निर्माण होणारा कचरा, आतडे, कातडे व हाडे सेंट मेरी स्कूल, फादरवाडीच्या पाठीमागे सुभाष गुलाब मेहेत्रे यांच्या शेतात टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच शेजारील नदीमध्ये या मांसाचा आर्क उतरत असल्याने येथील पाणी देखील खराब झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कत्तलखान्यात जनावरे कापून त्याचे निरोपयोगी मांस या परिसरात फेकले जात आहे. त्यामुळे परिसरातील पाणी दूषित होत असून विहिरींच्या पाण्यालाही दुर्गंधी आली आहे. तसेच या भागात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बजरंग दल आणि स्थानिक नागरिकांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन दिले असून, अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच या कचर्याची त्वरित विल्हेवाट लावावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली होती.
यावेळी विहिंपचे प्रशांत बेल्हेकर, विशाल वाकचौरे, कुलदीप ठाकूर, सुरेश कालडा, ओंकार भालेराव, किशोर गुप्ता, आदित्य गुप्ता, साई गुप्ता, अनिकेत पवार, किरण पाचारणे, हर्ष खोल्लम, शामल बेल्हेकर आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.