तळपत्या उन्हात रस्त्याचे डांबरीकरण

0
34

वाहतूक विस्कळीत आणि कामगारांचे हाल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे व काँक्रिटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले, तरी कामांच्या वेळापत्रकाबाबत आणि नियोजनाबाबत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. दुपारच्या तीव्र उष्णतेत सुरू असलेल्या डांबरीकरणामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होत आहे आणि कामगारांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ही कामे रात्रीच्या वेळेत करण्यात यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सकाळपासूनच कामाला सुरुवात होत असली तरी दुपारच्या सुमारास तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. या उष्णतेमुळे रस्त्यावर काम करणार्‍या कामगारांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. उष्माघात, थकवा, डोकेदुखी यांसारख्या त्रासांमुळे कामगारांची कार्यक्षमता देखील कमी होत असल्याचेही दिसून येते.

दुसरीकडे या महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी रस्ते अर्धवट बंद करून डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः शाळा, कार्यालये आणि बाजारपेठेच्या वेळेत नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भर उन्हात दुचाकी चालकांना रस्त्यावर उभे रहावे लागते. अनेकदा आपत्कालीन सेवा देखील या कोंडीत अडकण्याचा धोका निर्माण होत असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि नगरपालिकेकडे मागणी करण्यात येत आहे की, रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे रात्रीच्या वेळेत करण्यात यावीत. रात्रीच्या वेळेत वाहतूक तुलनेने कमी असते, तसेच तापमानही नियंत्रित असते. त्यामुळे काम अधिक सुरळीत आणि जलद गतीने पूर्ण होऊ शकते, असा नागरिकांचा विश्वास आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळेत कामे केल्यास दर्जाही चांगला राहतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण कमी तापमानात डांबर योग्य पद्धतीने बसते आणि रस्त्यांचा टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीनेही हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची दखल घेऊन कामांच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल आणि सर्वसामान्यांचा त्रासही कमी होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here