९५० किलो गोमांस जप्त, एलसीबीची आठवड्यात चौथी मोठी कारवाई

0
11

स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तल खान्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आक्रमक मोहीम राबवत सोमवारी आणखी एक मोठी कारवाई केली. या धाडीत तब्बल 950 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, एकाच आठवड्यातील ही चौथी मोठी कारवाई ठरली आहे. सलग होत असलेल्या कारवायांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नगर येथून येणारे एलसीबीचे पथक वारंवार कारवाया करत असताना, स्थानिक संगमनेर पोलिसांना या प्रकारांची माहिती कशी लागत नाही? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डीले आणि उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही धाड टाकली.
एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संगमनेर शहरातील गल्ली क्रमांक 6, जमजम कॉलनी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये नवाज जावेद कुरेशी हा आपल्या साथीदारांसह गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करत असल्याचे उघड झाले. माहितीची खातरजमा होताच पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला.


पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला मात्र घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मांस आढळून आले. तपासादरम्यान पोलिसांनी 2 लाख 85 हजार रुपये किमतीचे 950 किलो गोमांस, तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे – चाकू, काणस आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 2 लाख 87 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद आणि नावेद जावेद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) या फरार आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) तसेच प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे, एकाच आठवड्यात एलसीबीने केलेल्या चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण 20 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरून शहरात अवैध कत्तलखान्यांचे जाळे किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, हे स्पष्ट होत आहे. दरम्यान, एलसीबीचे पथक बाहेरून येऊन शहरातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करत असताना, स्थानिक पोलिस मात्र निष्क्रिय का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गातून जोर धरू लागला आहे.
सलग चार कारवायांनंतर संगमनेर शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? अशीही चर्चा रंगू लागली आहे. अवैध कत्तल खान्यांविरोधातील ही मोहीम आता आणखी तीव्र होणार का, आणि स्थानिक पोलीस यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here