मान्यवरांकडून बाबासाहेबांना अभिवादन करत केला विचारांचा जागर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात अभूतपूर्व उत्साहाचे आणि चैतन्यमय वातावरणाचे दर्शन घडले. शहरातील मुख्य चौकातील बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात सकाळपासूनच भीम अनुयायी, नागरिक आणि मान्यवरांची मोठी गर्दी उसळली होती.
जयंतीनिमित्त विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यामध्ये आमदार अमोल खताळ, आ. सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, तसेच माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवाच्या कार्याला अभिवादन केले.

यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनीही शासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. निळ्या ध्वजांनी सजलेले रस्ते आणि आकर्षक फुलांची सजावट यामुळे शहरात उत्सवाचे विशेष वातावरण निर्माण झाले होते.

अनेक मंडळांकडून नागरिकांसाठी थंड पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. बसस्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळही मोठी गर्दी होती; मात्र संगमनेरकरांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत अभिवादन केले. कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यामध्ये विविध कलापथके आणि आकर्षक चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती उत्सव समितीने दिली आहे.





















