देशभरातून ७७०+ विद्यार्थी, २५०+ टीम्सचा उत्स्फूर्त सहभाग; नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा संगम

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)-
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर येथे दिनांक 10 व 11 एप्रिल 2026 रोजी ‘EXCALIBUR 4.0’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला देशभरातून तब्बल 250 पेक्षा अधिक टीम्स आणि 770 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग लाभल्याने हा कार्यक्रम खर्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर गाजला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे साळुंके ऑटोमेशन प्रा. लि. नाशिक चे संस्थापक साहेबराव साळुंके, फॉक्स सोल्युशन्स प्रा. लि. नाशिकचे इंडस्ट्रियल सेल जनरल मॅनेजर प्रल्हाद धुमाळ, ऊर्जा IIT अकॅडमी अकोले संचालक डॉ. सुशील बेणके, वराडोम टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चाकण पुणेचे संस्थापक संदीप बन्सी गिर्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

या तांत्रिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी रोबो वॉर, रोबो रेस, रोबोथॉन, डिझाईन अरेना, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन आणि
ई-स्पोर्ट्स अशा विविध स्पर्धांमध्ये आपल्या कल्पनाशक्तीला वास्तवात उतरवले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, तांत्रिक कौशल्य आणि स्पर्धात्मक वृत्ती पाहून उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी प्रा. हेमंत पठाडे यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि अंमलबजावणीचे विशेष कौतुक केले. नाशिक, पुणे, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर येथील अनेक महाविद्यालयांमध्येही अशा दर्जाचा कार्यक्रम क्वचितच पाहायला मिळतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची, अनुभव घेण्याची आणि स्वतःच्या कल्पना सादर करण्याची उत्कृष्ट संधी मिळाली. शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत झाल्याचेही यावेळी स्पष्टपणे जाणवले.

या फेस्टमधील विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर विवेक धुमाळ, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, विभाग प्रमुख डॉ. विलास शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक प्रा. हेमंत पठाडे, सर्व शिक्षक आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
अशा प्रेरणादायी आणि भव्य तांत्रिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















