संगमनेर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ योजनेसाठी निवड

0
370

आ. खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत आणि भौतिक सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने आमदार अमोल खताळ यांनी राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठ पुरावा केला होता. या प्रयत्नांना अखेर यश आले असून राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करणे या महत्त्वाकांक्षी योजनेतर्गत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी आणि तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषदांच्या शाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्या अनुषंगाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 27 मार्च 2026 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला.या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण 478 शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी व तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये आधुनिक वर्गखोल्या, स्वच्छता सुविधा, डिजिटल शिक्षण साधने, क्रीडांगणे तसेच इतर आवश्यक भौतिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here