घरांचे पत्रे उडाले, पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान; अनेक जखमी, वीजपुरवठा खंडित

आश्वी प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील आश्वी, पानोडी, हजारवाडी, चणेगाव व परिसराला बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले, जनावरांचे गोठे व कोंबड्यांची खुराडी उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी पोल्ट्री फार्मचेही मोठे नुकसान झाले असून पशुधनाची हानी झाली आहे.

वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की हजारवाडी येथील घुगे वस्तीवरील घरांचे पत्रे थेट घरातील नागरिकांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत विजय घुगे, नामदेव घुगे यांच्यासह काही लहान मुले जखमी झाली असून त्यांच्या हातापायांना दुखापत झाली आहे. जखमींवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले.
दरम्यान, आश्वी इरिगेशन बंगल्याजवळ रस्त्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. आश्वी सबस्टेशनअंतर्गत अनेक वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने वीज लवकर पूर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याचे विद्युत वितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
पिंपरी फाटा येथे शेतकरी गीते ज्ञानदेव यांच्या शेतातील तब्बल शंभर लिंबाच्या झाडांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अचानक ओढवलेल्या या संकटामुळे शेतकरी व नागरिक हवालदिल झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.



















