मेडिकल व्यावसायिकांचा शहरात मोर्चा

0
1

ऑनलाइन औषध विक्री तातडीने बंद करण्याची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे वाढत असलेल्या औषध विक्रीविरोधात देशभरातील मेडिकल व्यावसायिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, रुग्णांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ई-फार्मसीवर कठोर निर्बंध अथवा संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 20) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी मेडिकल बंद आंदोलनाला संगमनेर तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी मोर्चा काढून प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन सादर केले.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येने मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले होते. वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे बनावट, मुदतबाह्य आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याची गंभीर चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.


केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे संगमनेर तालुकाध्यक्ष महेश अभंग यांनी सांगितले की, इंटरनेट व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून औषध विक्री मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या प्रक्रियेमुळे औषध विक्रीवरील नियंत्रण कमी होत असून अनेक वेळा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याचा धोका निर्माण होत आहे.
देशव्यापी बंदमध्ये संगमनेर शहर व ग्रामीण भागातील बहुतांश मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, रुग्णांच्या सोयीचा विचार करून रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने आणि आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना कोणत्याही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला नाही. औषध विक्रेत्यांनी केंद्र सरकारकडे ई-फार्मसी संदर्भात कठोर नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे. ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करून ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण आणावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

यावेळी व्यावसायिकांनी ऑनलाइन कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या मोठ्या सवलतींवरही आक्षेप घेतला. या अवास्तव सवलतींमुळे स्थानिक मेडिकल दुकानदारांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून, त्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे, बंदी असलेली औषधे किंवा नशेसाठी गैरवापर होऊ शकणारी औषधे ऑनलाइन सहज उपलब्ध होत असल्याने समाजात गंभीर परिणाम घडू शकतात अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव राजीव सिंघल तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील औषध विक्रेते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here