प्रशासनाचा अंगणवाडी सेविकांना इशारा
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे प्रश्न सोडवण्याचा महिला बालकल्याण विभागाचा प्रयत्न आहे. जे धोरणात्मक आहेत, ते सरकार पातळीवर सोपवण्यात आले असून उर्वरित विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यात येत आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी चर्चेसाठी पुढे यावेत. येत्या दीड महिन्यांत अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलचा विषय मार्गी लावण्यात येईल. यासाठी अंगणवाडी सेविकांनी कामावर हजर व्हावे, राज्यात कामवर हजर न झालेल्या 40 ते 50 सेविकांवर काम समाप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांनी कामावर हजर व्हावे
रुबल अग्रवाल,
आयुक्त महिला बालकल्याण, महाराष्ट्र शासन
युवावार्ता (प्रतिनिधी)
किमान वेतन मिळावे, यासाठी नगरसह राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या कर्मचार्यांनी 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात अद्याप तोडगा निघाला नसल्याने महिनाभरापासून अंगणवाड्यांना कुलूप आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्या अंगणसेविकांच्या संघटना आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने महिला बालकल्याण विभागाने आंदोलनकर्त्यांना कामावर हजर होण्याची नोटीस बजावली आहे. तात्काळ कामवर हजर व्हावा, अन्यथा सेवा समाप्त करणार असा आशय नोटीसमध्ये असून ज्या ठिकाणी सेविका आणि मदतनिस कामावर हजर होणार नाहीत, अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा महिला बालकल्याण विभागाचा प्रयत्न आहे.
4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे काम बंद आंदोलन सुरू असून यात एकट्या नगर जिल्ह्यात 5 हजार 375 अंगणवाडी सेविका, 792 मिनीसेविका व 4 हजार 510 मदतनीस असे 9 हजार 698 कर्मचारी सहभागी झालेल्या आहेत. गुरूवार (दि.4) पर्यंत यातील जिल्ह्यातील वेगवेळ्या तालुक्यातील सव्वा दोनशेच्या जवळपास अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या असून अन्य ठिकाणी हजर होत असून त्याचा अहवाल घेण्यात येत आहे. तसेच ज्या कामावर हजार होणार नाहीत, अशा सर्वांवर वरिष्ठांच्या आदेशानूसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक अंगणवाडी सेविकांना कामावर हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपामुळे 2 लाख 97 हजार बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला असून बालकांना सक्तीची सुटी मिळत आहे. त्याच सोबत अंगणवाडीतून मुलांचा पोषण आहार देणे, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार पुरवणे ही कामे प्रामुख्याने होतात. महिनाभराच्या संपामुळे या कामांवर परिणाम झाला.