रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर किरण कडू पाटील यांची सर्वानुमते निवड

0
159

समाजसेवा, शिक्षण आणि संस्कारांचा सन्मान


युवावार्ता (प्रतिनिधी)
अहिल्यानगर – रयत शिक्षण संस्थेतील उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील किरण अरुण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सात्रळसह संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित बैठकीत संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जनरल बॉडी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी किरण कडू पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थाविकासासाठीच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

किरण कडू पाटील यांनी आजोबा माजी आमदार कॉ. पी. बी. कडू पाटील तसेच वडील अरुण कडू यांच्या सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. रयत शिक्षण संस्थेला विविध माध्यमांतून भरीव देणग्या उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचन प्रकल्प राबविणे, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिमा प्रभावीपणे राबविणे आदी उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी, शालेय गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळावी यासाठी क्रीडा विभागाच्या माध्यमातून गिर्यारोहणासारख्या उपक्रमांना चालना देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी विविध यशस्वी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची व्याख्याने आयोजित करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रकल्पांमध्ये आणि उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच अग्रस्थानी राहिला असून त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व समितीने त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे, खासदार सुप्रिया सुळे, चेअरमन चंद्रकांत दळवी, अनिल पाटील, भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, विभागीय गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, प्राचार्य सिताराम गारुडकर, पर्यवेक्षिका हेमलता साबळे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख विलास दिघे, शाळा समिती पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षणप्रेमी, पालक, विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड होणे हा प्रवरा परिसरासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. प्रवरा परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखा अडचणीत असताना कडू कुटुंबीयांनी स्वतःची मालमत्ता विकून संस्था वाचविल्या आणि हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. विद्यार्थी घडविणार्‍या या महान परंपरेचा भाग बनण्याची संधी मिळाल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here