महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील प्रवरा नदी परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत नदीकाठी फिरण्यासाठी, आंघोळीसाठी किंवा कुटुंबासह विरंगुळ्यासाठी येणार्या महिला, युवती आणि नागरिकांना या प्रकारांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांतील काही तरुण दररोज सायंकाळी पाचनंतर प्रवरा नदी परिसरात मोठ्या संख्येने जमा होत असून, तेथे खुलेआम मद्यपान केले जात आहे. मद्यधुंद अवस्थेत हे तरुण मोठमोठ्याने आरडाओरडा करणे, अश्लील भाषेचा वापर करणे, शिवीगाळ करणे तसेच धिंगाणा घालून परिसरातील शांतता भंग करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नदी परिसरात निर्माण होणारे वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, नदी परिसरात आलेल्या मुली व महिलांकडे पाहून अश्लील टिप्पणी करणे, छेडछाड करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकारही वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक कुटुंबांनी सायंकाळच्या वेळेत नदी परिसरात जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काही सजग नागरिकांनी या प्रकारांना विरोध करत संबंधित तरुणांना समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली. काहींना मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्याचाही आरोप समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासन तसेच नगरपरिषदेच्या रक्षक दलाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, प्रवरा नदी परिसरात नियमित पोलीस गस्त सुरू करावी, मद्यपान करणार्यांवर कठोर कारवाई करावी तसेच महिला व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. नदी परिसर हा नागरिकांच्या विरंगुळ्याचा आणि सामाजिक संवादाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र वाढत्या गैरप्रकारांमुळे या परिसराची प्रतिमा मलिन होत असून वेळेत कारवाई न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





















