
चौकीसाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमले जाणार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातील वाहतूक कोंडीने ग्रस्त असलेल्या दिल्ली नाका परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. या चौकीच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचा विश्वास आ. खताळ यांनी व्यक्त केला.
पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुकाप्रमुख रमेश काळे, दादाभाऊ गुंजाळ, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, तसेच पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. खताळ म्हणाले, दिल्ली नाका परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी व अनुचित घटना घडत असतात.
या पार्श्वभूमीवर ही पोलीस चौकी हा सकारात्मक पाऊल आहे. चौकीसाठी स्वतंत्र पोलीस अधिकार्याची नेमणूक करण्यात येणार असून, त्यामुळे या भागातील कायदा- सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे म्हणाले, दिल्ली नाका हा संवेदनशील भाग आहे. येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिसून येते. नव्याने स्थापन झालेली ही पोलीस चौकी ही समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहील आणि नागरिकांचा सुरक्षिततेवरील विश्वास अधिक दृढ होईल. पोलीस चौकी तील अधिकारी व कर्मचारी निश्चितच प्रयत्नशील राहतील असे आश्वासन पोलीस उपाधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांनी दिले.