दैनिक युवावार्ता बातमीची दखल : तीन बत्ती चौकातील खड्ड्यांची बांधकाम विभागाकडून तात्काळ डागडूजी

0
1925

संगमनेर (प्रतिनिधी)
गेल्या काहि दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझीम पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. यात शहरातून जाणार्‍या नाशिक-पुणे राज्य महामार्गासह कोल्हार घोटी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ व वाहनांची हानी होत होती. या जनहिताच्या प्रश्‍नावर दैनिक युवावार्ताने काल शनिवारच्या अंकात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेरचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील यांनी तात्काळ दखल घेतली. काल संध्याकाळी बातमी प्रसिध्द झाल्यानंतर आज सकाळीच तीन बत्ती चौकातील खड्ड्यांचे डांबरीकरण करुन डागडूजी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल नागरिकांकडून कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील यांनी भल्यासकाळी स्वतः उपस्थित राहून रस्त्याची डागडुजी करून घेतली.

पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नित्कृष्ट दर्जामुळे तसेच साचलेल्या पाण्यामुळे, अवजड वाहनांमुळे रस्त्यांची मोठी हानी झाली आहे. या खड्ड्यांमुळे व त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. जनहिताच्या या प्रश्‍नांवर दैनिक युवावार्ताने वारंवार आवाज उठविला आहे. दोन दिवसांपुर्वीही नाशिक-पुणे महामार्ग तसेच सर्व्हिस रोडच्या दुरावस्थेबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातीलही अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. चुकीच्या पध्दतीने होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अल्पावधीतच रस्ते खराब होत आहे. यास सर्वस्वी ठेकेदार व प्रशासन जबाबदार आहे. पावसाळ्यात डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करणे शक्य नसले तरी या खड्ड्यांची डागडूजी करणे महत्त्वाचे आहे. नगरपालीकेच्यावतीने शहरातील काही रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये केवळ मुरुम आणि खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली मात्र ही खडी आणि मुरुम पावसामुळे व पाण्यामुळे निघून जाऊन पुन्हा या ठिकाणी खड्डे पडत आहे.


दरम्यान तीन बत्ती चौक परिसरातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहे तसेच सिमेंट काँक्रिटचा रस्ताही ठिकठिकाणी फुटला आहे. या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन या परिसरात खड्ड्यांवर पक्के डांबरीकरण करुन रस्ता मजबुतीकरण केले आहे. लवकर पुन्हा खड्डे पडणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असणार्‍या इतरही रस्त्यांची लवकरच चांगली डागडुजी करु अशी माहिती कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील यांनी दैनिक युवावार्ताशी बोलताना दिली.

दैनिक युवावार्तामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here