शहरातील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आणि पाण्याचे डबके
संगमनेर (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात पावसाची रिपरीप सुरू आहे. या पावसाने शेतकरी सुखावला असताना तालुक्यासह शहरातील रस्त्यांची मात्र चाळण झाली आहे. यात जुन्या रस्त्यासह नवीन रस्त्यावरही चोहिकडे खड्डेच खड्डे आणि पाण्याचे डबके अशी अवस्था झाली आहे. त्याचबरोबर नाशिक- पुणे महामार्गावरही ठिकठिकाणी खड्डे पडले असून शेजारचे सर्व्हिस रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून या खड्ड्यामुळे अपघाताची संख्या वाढत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत असून ठेकेदार व प्रशासनाच्या नावाने खडे फोडत आहे.
आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात नवीन रस्त्यांची कामे करण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नसलेल्या या कामामुळे अवघ्या एका पावसात या रस्त्यांची चाळण होण्यास सुरूवात झाली. ठिकठीकाणी खड्डे आणि पाण्याचे डबके आणि त्यातून वाट काढणारे वाहन चालक व पादचार्यांची कसरत नेहमी पहायला मिळत आहे. शहरातील शिवाजी महाराज पुतळा ते बाजारपेठ, जुने तांबे हॉस्पिटल ते तहसील कार्यालय, डीएम मुळे लाईन, नविन नगर रोड, सय्यद बाबा चौक, अकोले बायपास, तसेच अनेक उपनगरातील नविन रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ता करतांना कोणत्याही प्रकारची लेव्हल काढली जात नाही. तसेच पुरेसा दाबही दिला जात नाही. कमी प्रतीची खडी, सिमेंट, डांबर वापरून हे रस्ते होत आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणला मात्र ठेकेदारांच्या निकृष्ठ कामामुळे या विकास कामांना खिळ बसत आहे.
दरम्यान महामार्गावर टोल धाड सुरू असतांना महामार्गावरील खड्ड्यांकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. या खड्ड्यांमुळे वाहनांची मोठी झीज होत आहे. महामार्गावरील खड्डे वाचविण्यासाठी अनेक जण सर्व्हीस रोडचा वापर करतात. मात्र त्यावरही खड्ड्यांची मालिका दिसत आहे.
दरम्यान संगमनेर येथून गुंजाळवाडीकडे जाणार्या रस्त्यावर बायपास रस्त्यालगतच्या सर्व्हिस रोडवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांमुळे वारंवार दुर्घटना होत आहे. शाळकरी मुलांना या जीवघेणे खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे अपघात होऊ नये याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अशीच अवस्था घुलावडी ते रायतेवाडी पर्यंतच्या सर्व्हीस रस्त्यांची झाली आहे. त्याच बरोबर घुलेवाडी ते गुंजाळवाडी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. हा रस्ता मंजूर झाल्याचे केवळ सांगितले जाते. मात्र कोणत्याही प्रकारचे काम केले जात नाही. राजापूर, गुंजाळवाडी, वेल्हाळे या परिसरातील अनेक शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार या रस्त्याने प्रवास करतात. मोठी रहदारी असणार्या या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अन्यथा प्रशासनाविरूद्ध तीव्र आंदोलन करू असा इशारा नितिन अण्णासाहेब कसबे यांनी दिला आहे.