उत्कर्षा रूपवतेंनी दिला राजीनामा
शिर्डी मतदारसंघात प्रचंड खळबळ
वंचितकडून उमेदवारीचे संकेत
शिर्डी मतदारसंघातून उत्कर्षा रूपवते यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते, पक्षाकडे जोरदार मागणी देखील केली परंतु पक्षाने फारशी दखल न घेतल्याने व ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी सोडल्याने रूपवते या नाराज होत्या. मध्यंतरी त्यांनी वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे रूपवते या वेगळा विचार करणार हे बोलले जात असताना आज त्यांनी काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे लवकरच त्या वंचित कडून किंवा धक्कादायक रित्या महायुतीच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच आलेल्या सर्व्हेतून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या बाबतीत निगेटिव्ह अहवाल गेला आहे. त्यामुळे उत्कर्षा रूपवते या महायुतीच्या उमेदवार असल्यास आश्चर्य वाटायला नको.
संगमनेर
काॅंग्रेस पक्षाच्या युवा नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी आज काॅंग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या उत्कर्षा रूपवते यांनी काॅंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदासह काॅंग्रेस पक्षामुळे मिळालेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य पदासह सर्व पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा शिर्डी मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पक्ष प्रमुखाला पाठविलेल्या पत्रात उत्कर्षा रूपवते यांनी म्हटले आहे की, आज दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या “महासचिव” पदाचा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या “प्राथमिक सदस्यत्वाचा” राजीनामा देत आहे.
उपाध्यक्ष – शिर्डी लोकसभा युवक काँग्रेस, सचिव भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस, अध्यक्ष मुंबई विभागीय काँग्रेस संशोधन विभाग, अध्यक्ष – जवाहर बाल मंच, महासचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अशा विविध पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिल्याबद्दल मी आभार मानते. युवक काँग्रेस पासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास गेली 16 वर्षे मी पूर्ण प्रामाणिकतेने, कष्टाने व मेहनतीने केला आहे; महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये पक्षासाठी काम केले.
राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिल्यावर अतिशय संवेदनशीलपणे तळागळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांना साथ व न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली.
रूपवते – चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना, निस्वार्थपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो याबद्दल पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे असे विनम्रपणे नमूद करते!