
शिर्डीत तिरंगी लढत रंगणार; मविआ संकटात
काँग्रेस पक्षाने रूपवते परिवारावर प्रचंड प्रेम केले. मात्र रूपवते परिवार
राजकीय समावेशापासून नेहमीच वंचित राहिला. यावेळीही शिर्डीत
काँग्रेससाठी पोषक वातावरण होते. उमेदवार म्हणून तयारीही केली होती.
मात्र पक्षाने साथ न दिल्याने व हक्काचा मतदारसंघ दुसऱ्याला दिल्याने
आपल्याला हा धाडसी निर्णय घ्यावा लागला आहे
युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत लगेच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) गेली. त्यामुळे काँग्रेसकडून वारंवार लोकसभेची उमेदवारी नाकारली जात असल्याने उत्कर्षा रुपवते नाराज होत्या. अखेर त्यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. आता उत्कर्षा रूपवते वंचितकडून शिर्डी लोकसभेची निवडणुक लढविणार आहेत. येत्या दोन दिवसात पक्षाकडून त्यांची अधिकृत उमेदवारी जाहिर होणार आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीकडून सदाशिव लोखंडे आणि वंचितने उत्कर्षा रुपवते अशी तिरंगी लढत रंगणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होणार होती. दरम्यान दोन्ही उमेदवारांवर मतदारांमध्ये नाराजी होती मात्र त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यातच उत्कर्षा रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत होत्या. मात्र, या जागेसाठी ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी पुन्हा एकदा केली होती. तसेच, शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी उत्कर्षा रुपवते या वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. उत्कर्षा रुपवते यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट सुद्धा घेतली होती. अखेर त्यांनी काँग्रेसचा हात सोडत वंचितची साथ धरली. उत्कर्षा रूवपते यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे शिर्डीत मविआला मोठा धक्का बसला असून महायुतीचे लोखंडे यांना याचा राजकीय फायदा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.