
युवावार्ता प्रतिनिधी संगमनेर
शुक्रवार 7 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे आगामी ईद-ए-मिलाद या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर सण उत्साहात आणि शांततेमध्ये साजरे व्हावे, या उत्सव कालावधी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सण उत्सवाला गालबोट लागू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून संगमनेर उपविभागात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 खाली रेकॉर्डवरील व्यक्तींना संगमनेर तालुका व अकोले तालुका अर्थात संगमनेर पोलीस उपविभागामध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आलेले होते. त्यानुसार संगमनेर उपविभागातील एकूण 62 व्यक्तींचे प्रवेश बंदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.

संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना संगमनेर तालुका महसूल सीमेत प्रवेश करण्यास तर अकोले व राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना अकोले तालुका महसूल सीमेमध्ये प्रवेश करण्यास या निर्णयाद्वारे मनाई करण्यात आलेली आहे.
या प्रवेश बंदीचा कालावधी कालावधी हा दिनांक 7/9/2024 चे दुपारी बारा वाजेपासून ते दिनांक 17/9/2024 चे दुपारी बारा वाजेपर्यंत आहे. सदर आदेशांची बजावणी संबंधित व्यक्तींवर करण्यात आलेली असून या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका महसूल हद्दीमध्ये आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. विशेष करून पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते त्याचप्रमाणे वारंवार गुन्हे करण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती विरुद्ध सदरची कारवाई करण्यात आलेली असून अशा गुन्हेगारी व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.