
नाशिकमध्ये पुरस्कार वितरण, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील वडगाव पान याठिकाणी असलेले व हॉटेल क्षेत्रात अल्पावधीत नावाजलेले नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक श्री. विजय थोरात यांना काल शुक्रवार दि. २१ मार्च २०२५ रोजी नाशिक येथे स्टार्ट अप इंडिया रिसिल इन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई येथील रिसिल इन या संस्थेच्या वतीने देशातील व राज्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांना उद्योजकता पुरस्कार देण्यात येतो. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगतशील व्यावसायिकांना २०२५ या वर्षातील पुरस्कार देण्यात आला. यामध्ये हॉटेल व्यवसायात नावाजलेले संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक श्री. विजय थोरात यांनी अत्यंत अल्पावधीत आपल्या हॉटेलचा व्यवसाय प्रगतीपथावर नेऊन ठेवला. अत्यंत गरीब कुटुंबातून विजय थोरात हे मोठे झाले. त्यांनी भारतीय सैन्य मध्ये नोकरी केली. भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर होता. याच काळामध्ये त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. हॉटेल व्यवसायाचा कोणताच अनुभव नाही आणि या व्यवसायासाठी लागणारा मुबलक पैसा देखील त्यांच्याकडे नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही, आपल्याला या व्यवसायात प्रगती करून दाखवण्याची धडपड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी सर्व अडचणींवर मात करत सन २०१८ मध्ये संगमनेर तालुक्यातील वडगाव पान याठिकाणी नेचर अर्थ रिसॉर्ट नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला.
आपल्या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकाला काहीतरी वेगळे दिले पाहिजे, यासाठी त्यांनी हॉटेलच्या प्रवेश द्वारा सह आजूबाजूला विविध प्रकारचे झाडे लावली. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला याठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटायचे. त्याचबरोबर ग्राहकाला उत्तम जेवण व जलद सेवा यावर देखील त्यांनी आवर्जून लक्ष दिले आणि कमी कालावधीतच ग्राहकांचे मन जिंकण्यात नेचर अर्थ हे यशस्वी झाले. मागील सात वर्षात श्री. विजय थोरात यांनी संगमनेर सह श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, अकोले, लोणी येथील ग्राहकांना देखील नेचर अर्थ रिसॉर्ट कडे आकर्षित केले असून हे सर्वभेट देण्यासाठी याठिकाणी येत असतात. तसेच अनेक मान्यवर व मोठ मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींनी देखील या हॉटेलला भेट देवून कौतुक केले आहे. याच सर्व कामांची मुंबई येथील स्टार्ट अप इंडिया रिसिल इन या संस्थेने दखल घेत नेचर अर्थ रिसॉर्टचे संचालक श्री. विजय थोरात यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ देण्याचे जाहीर केला. या पुरस्काराचा वितरण सोहळा नाशिक येथे संपन्न झाला असून श्री. विजय थोरात यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री.विजय थोरात यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल अमोल कासार, अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सागर हासे, डॉ. सागर गोपाळे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांसह मित्र परिवार व वडगाव पान ग्रामस्थांनी अभिनंदन केले.