एव्हरेस्टची वाघीण – सुविधा कडलग

प्रचंड बर्फ असलेला उंच खडक चढाईसाठी त्यांची वाट बघत होता. खाली डोकावले तर पांढर्‍या बर्फात खोल दरी स्पष्ट दिसत होती. हिलरी स्टेपपर्यंत ते पोहोचले. पुढे पाऊल टाकताच एका गिर्यारोहकाचा मृतदेह दिसला. अंगात शिरशिरी आली. थरकाप सुरू झाला. मन सुन्न झाले. या उंच, अणकुचीदार हिलरी स्टेपवरून घसरून हा गिर्यारोहक पडला असावा याची जाणीव झाली. या मृतदेहाला उचलता येणार नव्हते कारण एवढ्या भयानक थंडीत ग्लोव्हज्, जॅकेट किंवा सिलेंडर काढणे शक्य नव्हते. त्या मृतदेहाकडे बघत दबकूनच ते पुढे पुढे जात होते.

दोन मुलांची आई असलेली पुण्याची सुविधा कडलग, 13 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा. एव्हरेस्टच्या मध्यावर असलेल्या कॅम्प 2 ला मुक्काम झाल्यानंतर नसानसात भिनलेले एव्हरेस्टचे शिखर चढण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाली. बेस कॅम्प, कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4, माऊंट एव्हरेस्ट शिखर (समिट उंची 8 हजार 848 मी.) असा तिचा गिर्यारोहणाचा प्रवास. कॅम्प 2 ला आल्यानंतर बाकीचे गिर्यारोहक थकलेले किंवा आजारी पडलेले होते. त्यातील बर्‍याचशा गिर्यारोहकांचे हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले. उणे 15 डिग्री सेल्सिअस या प्रंचड गोठणार्‍या थंडीच्या वातावरणात सुविधाने चढाईला सुरूवात केली. समुद्रसपाटीपासून 6400 मी. उंचीवर असताना मुलगी सान्वी आणि मुलगा श्रेयांसची आठवण तिला येत होती. लहानपणापासून आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न किंवा अ‍ॅथलिट होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही याची खंत तिच्या मनात होती. मात्र गिर्यारोहक म्हणून एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकविण्याचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच रोटेशन करत असताना कॅम्प 1 मध्ये तिच्या पायाला बुटाच्या चाव्यामुळे मोठी जखम झाली होती. चालताना ती जखम अजूनच चिघळत होती. जखमेला कोरडी हवा मिळाल्यास ती भरून यायला मदत होईल; पण कडाक्याच्या या थंडीत बूट काढताही येणार नव्हते. कॅम्प 2 मध्ये जखमेला कापसाचे बँडेज बांधले होते तेवढाच काय तो तिला आराम!


अंगात डाऊन सूट, डंगरी, ग्लोव्हज्, गॉगल, 3 किलोचा शूज असा साधारण 5 किलोचा वाढीव ऐवज. चढाई सुरू असतानाच चिमणी एरिया आला. चिमणी एरियामध्ये गुरूत्वाकर्षणाच्या विरोधी दिशेने निमुळत्या भागाकडे उलटे लटकून चढाई करावी लागते. चढाई सुरू असताना दरवेळी सेफ्टी दोरी ती चेक करत होती. या प्रवासादरम्यान एक गोष्ट तिच्या लक्षात आली ती म्हणजे बरोबर असणारा शेर्पा अचानक कुठेतरी गायब झाला. ‘आय हॅव टू मुव्ह ऑन’ म्हणत ती मार्गक्रमण करू लागली. पुढे चढल्यानंतर अचानक मोठमोठे दगड सुविधाच्या दिशेने पडू लागले. वरती असलेल्या गिर्यारोहकांनी तिला आवाज दिला. ती सावध झाली, पुढच्या आईस वॉल ला धक्का देऊन, झुमारने लॉक करून रोपवर ती लटकली आणि आपला जीव वाचवला. मोठा दगड पायामधून गेला होता. तिने परमेश्वराचे मनापासून आभार मानले. आपण अजूनही जिवंत आहोत याची स्वत:ला जाणीव करून दिली. सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना घडते तेच अचानक एक मोठी वस्तू तिच्या कानाजवळून गेली. एकदम मोठा आवाज झाला. कान सुन्न झाले. एखाद्याने कानाखाली वाजविल्यानंतर कान जसा सारखा वाजतो तसा कान वाजू लागला. खालचे गिर्यारोहक ज्यावेळी वरती चढून आले तेव्हा त्यांनी सांगितले की तो ऑक्सिजन सिलेंडर होता. वरच्या बॅगमधून सुटून तुझ्या अंगावर आला होता. पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देत तिने मनाला प्रश्न केला की ‘आज मी जिवंत पोहोचेल का?’ मात्र शिखरावर फडकविण्यासाठी घेतलेला तिरंगा सतत प्रोत्साहित करीत होता. पाच तासांचा हा खडतर प्रवास करून कशीबशी ती कॅम्प 3 ला पोहोचली. पायाची जखम ओली झाली होती. त्यात पस झाला आणि इन्फेक्शन झाले तर बेस कॅम्प ला जावे लागेल ही भीती वाटत होती. जिद्द न हारता दुसर्‍या दिवशी पुन्हा कॉटन बँडेज, दोन सॉक्स घालत जखमेकडे दुर्लक्ष केले.


आता तिला कॅम्प 4 (उंची 7 हजार 800 मी.) पर्यंत पोहोचायचे होते. सकाळीच प्रचंड सोसाट्याचा वारा आणि बर्फवृष्टी सुरू झाली. हवामानात सतत बदल होत होता. समोरचे दिसण्यासाठी पुरेसा प्रकाश आवश्यक होता मात्र बर्फामुळे सतत गॉगल घालावा लागत होता. नैसर्गिकरीत्या डोळे अगदी लहान झाले होते. पापण्या लहान झाल्या होत्या. गॉगलमधूनसुध्दा बर्फ डोळ्यांत जात होता. गॉगल पूर्णपणे पांढरा झाला होता. गॉगल भुवईवर ठेवून डोळ्यांखालच्या छोट्या खाचेतून ती समोरची वाट बघण्याचा प्रयत्न करत होती. सहकारी गिर्यारोहकांना तिने वाट दाखविण्याची विनंती केली. कॅम्प 3 आणि 4 च्या मध्ये लोहास्ते बेस कॅम्प 4 लागतो. तेथे ग्रुप पोहोचला. ज्या शेर्पाला मदतीसाठी, वाट दाखविण्यासाठी बरोबर घेतले होते त्याच शेर्पाने ऐनवेळी टांग दिली होती. तो गायब झालेला शेर्पा अचानक समोर आला आणि हसायला लागला. टांग दिलेल्या या शेर्पाची टांग खेचावी असे मनापासून तिला वाटले पण मनावर मोेठा दगड ठेवत तिने त्याही परिस्थितीत स्मितहास्य दिले. कसे बसे सर्वजण कॅम्प 4 पर्यंत पोहोचले.


साधारणत: संध्याकाळी सहा वाजता कॅम्प 4 ला ग्रुप पोहोचला. एव्हरेस्ट शिखर (समिट) (उंची 8 हजार 848 मी.) ची चढाई दुसर्‍या दिवशी रात्री सुरू करायची होती. सुविधासोबतचा शेर्पा उशिरा आल्यामुळे बाकी सहकारी पुढे निघून गेले होते. रात्री 9 वाजता शिखराच्या वाटचालीकडे शेर्पा आणि सुविधा निघाली. प्रचंड थंडी, सोसाट्याचा वारा, खोल दर्‍या असा तिचा प्रवास सुरू झाला. देवाची कृपा आणि मानसिक इच्छाशक्ती प्रबळ असल्याने पायाची जखम सुकली होती. 8000 मी च्या वरचा प्रवास म्हणजे कधीही ऑक्सिजन सिलेंडर बदलावे लागणार. बरोबर असलेले सिलेंडर किती वेळ साथ देतील आणि बिघडलेले वातावरण शांत होईल का हाच विचार तिच्या मनात सतत सुरू होता. जोरदार बर्फवृष्टी आणि निर्दयी वारा बघून 70 मधील 25 गिर्यारोहकांनी शिखराकडे न जाण्याचा निर्णय घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागले. तिलाही भीती वाटत होती. मात्र एवढे परिश्रम आणि ठेवलेला संयम वाया जाईल, तिरंगा फडकवण्याचे स्वप्न अधुरे राहील या विचाराने त्याच जागेवर थांबून हवामान शांत होण्याची वाट बघितली. काही वेळाने हवामान शांत झाले आणि ते पुढे निघाले.


प्रचंड बर्फ असलेला उंच खडक चढाईसाठी त्यांची वाट बघत होता. खाली डोकावले तर पांढर्‍या बर्फात खोल दरी स्पष्ट दिसत होती. हिलरी स्टेपपर्यंत ते पोहोचले. पुढे पाऊल टाकताच एका गिर्यारोहकाचा मृतदेह दिसला. अंगात शिरशिरी आली. थरकाप सुरू झाला. मन सुन्न झाले. या उंच, अणकुचीदार हिलरी स्टेपवरून घसरून हा गिर्यारोहक पडला असावा याची जाणीव झाली. या मृतदेहाला उचलता येणार नव्हते कारण एवढ्या भयानक थंडीत ग्लोव्हज्, जॅकेट किंवा सिलेंडर काढणे शक्य नव्हते. त्या मृतदेहाकडे बघत दबकूनच ते पुढे पुढे जात होते. सुविधाच्या पुढे काही गिर्यारोहक होते. त्यांनी हिलरी स्टेप पार केली होती. काही जण सरळ रेषेत चढत होते. दुसर्‍या टीम मधल्या दोन गिर्यारोहकांनी शॉर्टकटचा वापर म्हणून सरळ रेषेत चढण्याऐवजी वेडेवाकडे वळण निवडले. निसर्गाच्या नियमाविरोधात चढाई करणार्‍या या दोनही गिर्यारोहकांचा तोल गेला. प्रंचड मोठ्या दरीत ते पडले. या प्रचंड उंच, बर्फाच्छादित शिखरावर गिर्यारोहकांना सटकलेले पाहून सुविधाला खूप वाईट वाटत होते. 1 मृतदेह आणि 2 मृत्यू पाहिल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. मात्र संयम आणि निसर्गाचा मान राखत हळू हळू सकाळी 8.30 वाजता दोघेजण हिलरी स्टेपपर्यंत (उंची 8790 मी.) पोहोचले.
हीच ती निर्णायक सकाळ होती. एव्हरेस्ट शिखर जणू आता तिला बोलावत होते. हिलरी स्टेपपासून एव्हरेस्ट शिखराचा प्रवास त्यांनी सुरू केला. थोडा, थोडा ऑक्सिजन वापरून, बर्फ तुडवत, खोल दर्‍या पार करत ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले.


‘हिप हिप हुर्रे’
‘हिप हिप हुर्रे’
‘वी हॅव डन इट’
‘वी आर ऑन दि एव्हरेस्ट’

एक छोटीशी गृहिणी, दोन मुलांची आई एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली. समुद्रसपाटीपासून 8848.86 मी. उंचावर सुविधा पोहोचली. वार्‍याचा प्रचंड वेग आणि दबाव, प्रचंड बर्फ. डोळ्यात आनंदाश्रू. थकलेले पाय आता स्थिरावले होते. एखाद्या आर्मी जवानाप्रमाणे देशाची सेवा करावी असे बाळगलेले स्वप्न या 10 दिवसांत पूर्ण होताना ती बघत होते. बॅगमध्ये खास नऊवारी आणली होती. सर्व बाजूंनी स्टिचिंग करून फक्त तिला नेसणे एवढेच काम ठेवले होते. वार्‍याच्या प्रचंड झोतातही आपली मराठमोळी संस्कृती टिकविण्याच्या हेतूने तिनेे नऊवारी काढली. कशीबशी सूटवरतून ती नेसली. प्रचंड वार्‍यापुढे नऊवारी सतत निघत होती. नऊवारीसोबत कसाबसा फोटो काढला. यानंतर तो क्षण आला ज्याची ती आतुरतेने वाट पहात होती. तिने बॅगेतून राष्ट्रध्वज काढला. तिरंगा एव्हरेस्टच्या शिखरावर फडकवला. सोबत मराठी अस्मितेचा भगवा सोबत नेला होता. भगवाही फडकवला. सुविधाचा ऊर भरून आला.
थरथर करत कापणार्‍या शरीरातून होणारी हालचाल आता बंद झाली. ओठातून शब्दच निघत नव्हते. मात्र लतादीदींनी गायलेले
‘ए मेरे वतन के लोगो,
जरा आँख में भर लो पानी,
जो शहीद हुए है उनकी,
जरा याँद करो कुर्बानी’

हे गाणे आपोआपच गायले जात होते. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आज तिच्या वाट्याला आला होता. एव्हरेस्ट शिखरावर बसून तिने खूप फोटो काढले आणि बसलेली असतानाच ती भूतकाळात हरखून गेली.


सुविधाचे बालपण मुंबईजवळील वर्सोवा गावात गेले. घरची परिस्थिती हलाखीचीच होती. लहानपणी तिची दोनच स्वप्ने होती. एकतर सैन्यात सामील होणे किंवा अ‍ॅथलिट होणे. नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. 16 वर्षांची असताना किडनीच्या आजाराने वडिलांचे निधन झाले. शिक्षण करावे की जॉब हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. संभाषण कौशल्य चांगले असल्याने लहान वयातच टेलिकॉलर म्हणून तिने जॉब सुरू केला. त्यानंतर ‘आयबीएम दक्ष’ या आय.टी. कंपनीमध्ये 8 वर्षे काम केले. ही कामे सुरू असताना तिच्या मनातील अ‍ॅथलिट शांत बसत नव्हता. मन जॉबमध्ये जास्त लागत नव्हते.
2014 मध्ये सुविधाचे लग्न राजेंद्र कडलग यांच्याशी झाले. मिस्टरांच्या गॅरेज आणि कार शोरूममध्ये थोडी थोडी लक्ष ती घालू लागली. बोरीवलीमध्ये एकदा फुटबॉल मॅच जिंकली आणि संध्याकाळी घरी आल्यावर अचानक पोट दुखू लागले. सोनोग्राफी केल्यानंतर लक्षात आले की गर्भवती आहे. वयाच्या 25 व्या वर्षी सुविधा सान्वीची आई झाली. दोनच महिन्यानंतर ती फिटनेससाठी धावू लागली. बालेवाडी स्पोर्टस् क्लबमध्ये धावण्याचा नियमित सराव सुरू झाला. 2019 मध्ये मुलगा श्रेयांसचा जन्म झाला. त्यानंतर लगेचच पुन्हा फिटनेस सुरू. सोसायटीचे 11 मजले ती चढउतार करू लागली. मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देत असतानाच दररोज 10 किमी धावण्याचा सराव करू लागली. धावण्याबरोबरच तिला ट्रेकिंगची गोडी लागली. दर रविवारी सिंहगड चढणे हा छंद झाला. शाहू महाराज जयंतीनिमित्त झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ती पहिली आली आणि तेथूनच ट्रिगर मिळाला. सह्याद्री पर्वतरांग चढण्यासाठी मूलभूत रॉक क्लायंबिंगचा छोटासा कोर्स तिने पूर्ण केला. दोरी लावून नेमके हे लोक चढतात कसे हे आता उमजू लागले. एव्हरेस्टवीर भगवानदादा चवले यांनी सुविधाला मार्गदर्शन केले. शिवाजीनगर येथील भिंतीवर चढण्याचा सराव तिने केला. तेथे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देणारे अमोल जोगदंड भेटले. त्यांनी वेगवान आणि तांत्रिक पध्दतीने चढाई कशी करायची याचे प्रशिक्षण दिले. मंटू मंत्री आणि इरफान शेख हे नंतर तिच्या एव्हरेस्ट प्रशिक्षणाचा भाग बनले. आता ट्रेनिंग पूर्ण झाले होते.
2021 साली एव्हरेस्ट सर करण्याआधी आपल्या भारतातील लेह येथील 6250 मी. उंचीवर असलेले कांग्यास्ते 2 पर्वत चढविण्याचे ठरविले. ‘द अल्पिनिस्ट’ या संस्थेशी यावेळी ती जोडली गेली. पर्वत चढताना पूर्ण बाह्यांचे टी शर्ट, ट्रेकिंग पँट, नेहमीचे शूज हे पुरेसे नसते हे कळाले. क्रॅम्पॉन्स पॉईंटवर पोहोचल्यानंतर शेर्पाने त्याच्याजवळील अतिरिक्त जॅकेट आणि क्वाचा शूज दिले. या प्रवासाचे वैशिष्ट्य असे होते की 10 पावले चालणे आणि 2 सेकंद थांबणे. अनेक अडचणींचा सामना करत टीम शिखरावर पोहोचली. बर्फाच्या डोंगरात शरीर साथ देते की नाही याची जाणीव या पर्वतावर झाली. या शिखरावर ग्रुपमधील 19 पैकी 7 गिर्यारोहक पोहोचले आहेत त्यातील सुविधा एकमेव महिला आहे.
2022 साली लेह येथील माऊंट नन शिखरावर जाण्याचे ठरविले. या मोहिमेसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग अँड अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्, दिरांग, अरूणाचल प्रदेश येथे पर्वतारोहणाचा अभ्यास पूर्ण केला. येथील कर्नल अमित बिस्त आणि जनरल दुहाण यांचे भरीव सहकार्य झाले. कुटुंबाला त्रास नको म्हणून पहाटे 3 वाजता उठून 20 किलो वजनाची बॅग घेऊन तिने सराव पूर्ण केला. या सरावामुळे माऊंट नन शिखर पार करणे शक्य झाले. 16 जणांच्या टीममधील केवळ 2 गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले. यात सुविधा महाराष्ट्रातील एकमेव व प्रथम महिला गिर्यारोहक आहे.


आता मात्र सुविधाला एव्हरेस्ट शिखर खुणावत होते. पण यासाठी एक मोठी अडचण होती. या मोहिमेचा खर्च साधारणत: 35 लाख एवढा होता. सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने मोठ्या खर्चासाठी निधी संकलन अवघड होते. गणपती किंवा नवरात्रीमध्ये स्पॉन्सरशीप मिळेल असा विश्वास होता. पण एवढी मोठी रक्कम उभी राहू शकली नाही. आ. बाळासाहेब थोरात आणि अन्य मंत्र्यांनी मदत केली. एनआयएम ने सूट आणि इक्विपमेंट दिले. याव्यतिरिक्त उरलेला सर्व खर्च सुविधाचे पती राजेंद्र कडलग यांनी केला. सकाळी जीम, जोर, बैठका, सपाट्या, दुपारी 3 तास रनिंग असा दिनक्रम. 1 दिवस धावणे, 1 दिवस ट्रेकिंग, 1 दिवस चालणे आणि रविवार सिंहगड ट्रेक हा आठवड्याचा कार्यक्रम ठरला होता. मुलांच्या जेवण, नाश्ता आणि शाळेच्या तयारीसाठीचा वेगळा वेळ ती नेहमी काढत असे.
शेवटी एव्हरेस्टकडे निघण्याचा दिवस आला. नेपाळ येथील काठमांडूत लुकला विमानतळावर टीम पोहोचलो. तेथून एव्हरेस्ट व्यूव्ह पॉईंटवर सर्वजण गेले. सर एडमंड हिलरी शाळेजवळ थांबून कचरा संकलन मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर बेस कॅम्पजवळ (उंची 5 हजार 365 मी.) टीम पोहोचली. बेस कॅम्प आणि कॅम्प 1 च्या मध्ये असणार्‍या कुंभू ग्लेशिअर येथून 3 शेर्पा गायब झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. कुटुंबातील सदस्य यावेळी चिंतेत पडले. मात्र त्यांनी सुविधाला पुढे जाण्यासाठी पाठबळ दिले. बेस कॅम्पपासून पुढे असणार्‍या कुंभू ग्लेशिअर येथे टीमने सराव केला. समिट विंडो (शिखरावर जाण्याचा दिवस) जोपर्यंत उजाडत नाही तोपर्यंत शिखरावर जाता येणार नव्हते. तोपर्यंत सराव करायचा होता. प्रत्येक 20 मिनिटांनंतर शरीरात पाणी जाईल याची खात्री ती करीत होती. घरची चिक्की आणि लाडूने बॅगचे वजन जरी वाढले असले तरी शरीराला ऊर्जा देण्यासाठी घरगुती नुस्खे उपयोगाला येणार याची सुविधाला खात्री होती. अशा प्रकारे कॅम्प 1,2,3 ते बेस कँम्प (1 रोटेशन) असा सर्व गिर्यारोहकांचा सराव झाला. समिट विंडो म्हणजेच शिखरावर जाण्यायोग्य वातावरण ज्यावेळी झाले तेथून मग बेस कॅम्प ते समिट म्हणजेच शिखर प्रवास तिने पूर्ण केला.
शेर्पाने सुविधाला जोरात आवाज दिला तेव्हा ती भानावर आली. आपण भूतकाळात बराच काळ रमलो हे तिला जाणवले. ‘मॅडम हम लोग समिट पे है, ऑक्सिजन खतम होने को आया है, जल्दी निकलना पडेगा!’
नऊवारी परत बॅगेत टाकली. तिरंग्याला किस करत तिरंगा सुध्दा पुन्हा बॅगेत ठेवला. ज्या हिलरी स्टेपला मृतदेह दिसला त्या हिलरी स्टेपवरून खाली उतरताना ती भलतीच घाबरली होती. हळूवारपणे कॅम्प 4, कॅम्प 3, कॅम्प 2 , कॅम्प 1 आणि बेस कॅम्प असा परतीचा प्रवास तिने केला. या प्रवासात कुठलीही धावपळ केली नाही.
पायातील जखमा आता कुठच्या कुठे पळून गेल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी रायगडावर असलेला अत्यानंद आज तिला एव्हरेस्ट सर केल्यानंतर झाला होतो. गॉगलने गालाला इजा झाली होती, शरीराला अनेक ठिकाणी जखमा होत्या. प्रचंड अशक्तपणा आलेला होता. कधी एकदा घरच्यांना जाऊन भेटते असे तिला झाले होते.
परतीच्या प्रवासाला ती लागली. विमानात बसल्यावर तिच्याबरोबर कोण-काय बोलतोय हे सुध्दा तिला कळत नव्हते. वेगळ्याच तंद्रीत होती. सुविधा पुण्याला पोहोचली. पती राजेंद्र , सान्वी आणि श्रेयांस यांना भेटून प्रचंड आनंद झाला. पती राजेंद्र यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीचे, प्रोत्साहनाचे, प्रेमाचे विलक्षण कौतुक वाटत होते. त्यांच्या चेहर्‍यावर सुविधाने केलेल्या कामगिरीचा अभिमान स्पष्ट जाणवत होता. यानंतर पुणे-मुंबई, संगमनेर सासरीे अनेक सत्कार झाले. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनीसुध्दा सत्कार करून कौतुक केले. अडचण एकच होती, संवाद साधत असताना अचानक कानाजवळून गेलेला ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज अजूनही मधूनच तिच्या कानात घुमत होता.


दोन मुलांची आई, सामान्य कुटुंबातील महिला एव्हरेस्ट शिखर (समिट) पार करून शकते हे तिने दाखवून दिले. सैन्यात सामील नसली, अ‍ॅथलिट नसली तरी भारताचा राष्ट्रध्वज एव्हरेस्टवर फडकविल्याचे प्रचंड समाधान तिला आयुष्यभर पुरणार आहे.
स्त्री मध्ये खूप शक्ती आहे, ताकद आहे. तिला ती ओळखता आली पाहिजे. तन्वीर गाझी यांनी शब्दबध्द केलेल्या गीतामध्ये खूप काही दडलंय !
तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश है
जो तुझ से लिपटी बेड़ियाँ
समझ न इनको वस्त्र तू
ये बेड़ियाँ पिघाल के
बना ले इनको शस्त्र तू
चरित्र जब पवित्र है
तो क्यों है ये दशा तेरी
ये पापियों को हक़ नहीं
कि ले परीक्षा तेरी
जला के भस्म कर उसे
जो क्रूरता का जाल है
तू आरती की लौ नहीं
तू क्रोध की मशाल है
तू क्रोध की मशाल है
तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश है
समय को भी तलाश है

सुदीप किसन हासे
लेखक कॉम्प्यटर इंजिनिअर असून
दैनिक युवावार्ताचे कार्यकारी संपादक आहेत.
7720046005 hase.sudeep@gmail.com

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख