झेडपी शाळेत वाचनालयाचे उद्घाटन , 20 लाख निधी
युवावार्ता(प्रतिनिधी)
अकोले – सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेंचे खाजगीकरण केले नाही, तसेच करणार देखील नाहीत. फक्त शाळेची भौतिक परिस्थिती सुधरावी यासाठी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचे ठरविले आहे. यात शाळांचे खाजगीकरण हा मुद्दा बिल्कुल नाही. हा निर्णय समजून घेतला पाहिजे, मुळात मी सुद्धा शाळा खाजगीकरण, नोकर्यांचे खाजगीकरण याच्या विरोधात आहे. मात्र हे विषय देखील पुर्णत: समजून घेणे महत्वाचे आहे. परंतु येणार्या काळात शाळांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने केला तर तो आत्मघाती निर्णय ठरेल असे मत अकोले तालुक्याचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले. उंचखडक बु. येथील जि. प.शाळेत वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
आ. लहामटे पुढे म्हणाले. की, शाळा दत्तक योजना ही समजून घेतली पाहिजे. एका दृष्टीकोणातून हा निर्णय आज चांगला वाटतो तर उद्याच्या खाजगीकरणाची भिती म्हणून अनेकांच्या मनात साशंकता असणे सहाजिक आहे. त्यामुळे, सरकारने यावर विचार केला पाहिजे. पण, यापलिकडे जाऊन विचार केला तर, जशी उंचखडक बु येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळा गावातील तरुणांनी उभी केली. तिला आपली अस्मिता माणून बंद पडणारी शाळा आज 70 मुलांवर नेवून ठेवली हे फार कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. खरंतर विश्वासच बसत नाही की, शुन्य पटाची शाळा आज येथे केजी ते चौथी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. प्रत्येक वर्गात मॅट आणि वर्गात प्रॉजेक्टर व एलसीडी असू शकतात, काल पर्यंत खिन्न दिसणारी शाळा आज बोलकी झाली असून 24 तास वाचनालय शाळेने सुरु केले आहे. त्यामुळे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर शिंदे आणि त्यांची टिम तसेच रवी रुपवते व महादेव आहेरकर यांचे कौतूक केले पाहिजे. राज्यात अशा शाळा उभ्या राहिल्या तर दत्तक देण्याचा विचार सुद्धा कोणी करणार नाही. गावातील तरुण आणि पालक तसेच शाळा व्यवस्थापन कमिट्या इतक्या कार्यक्षम असतील तर शाळा बंद पडणार नाही आणि पटही कमी होणार नाही. गावाचा इतका सहभाग पाहुन मी उंचखडक बु शाळेला 20 लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच येणार्या काळात ही शाळा एक रोल मॉडेल कशी होईल अशी सुविधा येथे देण्याचा प्रयत्न करणार आहे.