पोलिसांची धडक कारवाई; डॉक्टरसह ९ जण अटकेत, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
श्रीरामपूर – श्रीरामपुर उपविभागात बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणार्या टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला असून, या प्रकरणात एका डॉक्टरसह एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. लोणी पोलीस स्टेशन व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त कारवाईत ही धडक मोहीम पार पडली.
दि. 29 एप्रिल रोजी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात निळवंडे कॅनॉलजवळील एका खोलीत महिलांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात आहे. या माहितीच्या आधारे तात्काळ सापळा रचण्याचे आदेश देण्यात आले. लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. ग्रामिण रुग्णालय लोणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती पवार, तालुका समुचित प्राधिकारी डॉ. गोकुळ घोगरे, तसेच पंच यांच्या उपस्थितीत बनावट गर्भवती महिला ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.

सदर ठिकाणी गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून छापा टाकला. यावेळी दोन खोल्यांच्या घरात आरोपी रंगेहात सापडले. चौकशीत आरोपींनी आपली नावे डॉ. राहुल भनगे (वय 34, नेवासा) व अभिजीत भुसाळ (वय 30, राहाता) अशी सांगितली. हे दोघेही महिलांकडून पैसे घेऊन पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भाचे लिंग सांगत असल्याचे उघड झाले.
या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या 8 गर्भवती महिलांचीही चौकशी करण्यात आली. या महिला बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव व पुणे येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे नातेवाईक बाभळेश्वर येथे थांबले होते, तर महिलांना कारमधून घटनास्थळी आणण्यात आले होते.

छाप्यात पोलिसांनी सुमारे 24 लाख 9 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये लाईफ प्लस यूएसजी पोर्टेबल मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम, तसेच तीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल, लोणी येथे तपासणी केली असता सर्व महिला गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित महिलांचे पती व नातेवाईकांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट 1961 तसेच पीसीपीएनडीटी कायदा 1994 अंतर्गत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कोणतेही वैध प्रशिक्षण किंवा नोंदणी नसताना बेकायदा पद्धतीने गर्भलिंग तपासणी करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत. गर्भलिंग तपासणीवर कायद्याने बंदी असतानाही असे प्रकार सुरू असल्याचे उघड झाल्याने समाजात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अशा बेकायदा रॅकेट्सना मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.





















