कै. सोमनाथ कडलग यांना शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात मोठा मान

संगमनेर (युवावार्ता) –
तालुक्यातील जवळे कडलग येथील प्रा. सोमनाथ काशिनाथ कडलग (सर) यांचे सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सोमवारी रात्री जवळे कडलग येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात करण्यात आला.
स्व. सोमनाथ कडलग यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.जुन्या काळात एम.ए.बी.एड. शिक्षण असलेल्या कै. सोमनाथ कडलग सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये भरीव योगदान दिले. जवळे कडलग येथील शाळेमध्ये सेवा दिल्यानंतर त्यांनी कोल्हेवाडी, रहिमपूर, संगमनेर आणि अंभोरे येथील शाळेमध्ये उत्कृष्ट काम केले. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच शाळेच्या विकासावर, शिक्षकांच्या ट्रेनिंगवर आणि विद्यार्थ्यांच्या शालेय आणि शाळाबाह्य विकासावर मोठे काम केले. अंभोरे येथील सह्याद्रीच्या शाळेमध्ये प्राचार्य पदावरून ते सेवानिवृत्त झाले.
शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी जवळे कडलग येथील शेतीमध्ये सुद्धा क्रांती केली. मुलांच्या सहाय्याने उत्कृष्ट शेती त्यांनी केली. अतिशय कष्टाळू आणि करारी असलेल्या कै. सोमनाथ कडलग यांना शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात मोठा मान होता. त्यांच्या करारी आणि स्पष्टवक्तेपणामुळे समाजातील अनेक वाद त्यांनी मिटवले. आपल्या मुलांबरोबरच पुतन्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांनी त्यांचा देखील सांभाळ केला. एकूणच कडलग कुटुंबियांच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोठे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी गं. भा. विमल सोमनाथ कडलग, रामनाथ काशिनाथ कडलग, अशोक काशिनाथ कडलग (भाऊ), रत्ना दिगंबर देशमुख (बहिण) आहेत. एक चिरंजीव प्रा. डॉ. सुनिल सोमनाथ कडलग हे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख असून दुसरे चिरंजीव धनंजय सोमनाथ कडलग हे पुणे येथे आय.टी. क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत. मुलगी ज्योती राजेंद्र देशमुख या छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पुतणे संदिप गोरक्षनाथ कडलग, विशाल रामनाथ कडलग, प्रमोद अशोक कडलग, सचिन गोरक्षनाथ कडलग हेही उच्चशिक्षित असून मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने स्व सोमनाथ कडलग सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्राध्यापक सोमनाथ कडलग सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🚩