
महिलेच्या पोटातून काढला चार किलोचा गोळा
डॉ. प्रविणकुमार पानसरेंचे कौतुक
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सततच्या पोटदुखीमुळे हैराण असलेली एक 45 वर्षीय महिला उपचारासाठी शहरातील प्रसिद्ध अशा धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आली. आणि डॉक्टरांनी अवघड अशी शस्त्रक्रिया करून या महिलेच्या पोटातून तब्बल चार किलोचा गोळा बाहेर काढून सदर महिलेला जीवदान दिले. हि अवघड व जीवघेणी शस्त्रक्रिया करण्यात नामवंत शल्यविशारद डॉ. प्रवीणकुमार पानसरेंसह व त्यांच्या टिमला मोठे यश मिळाले आहे.

याबाबत माहिती अशी, नेवासा तालुक्यातील मुक्तापूर येथील एक 45 वर्षीय महिला पोटदुखी, भूक न लागणे व पोटात गाठ जाणवणे अशा लक्षणांनी त्रस्त होती. अनेक ठिकाणी उपचार केले मात्र कुठेही शाश्वत निदान झाले नाही आणि आजारही बरा झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्रास वाढत चालला होता. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर शेवटी संगमनेरातील धन्वंतरी हॉस्पिटल बाबत त्यांना माहिती व खात्री मिळाली. आणि त्या धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या. त्यावेळी डॉ. पानसरे यांनी काही तपासण्या करण्याचा निर्णय घेतला.
सिटीस्कॅन केल्यानंतर पोटात एक मोठी गाठ असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. अगदी ओटीपासून तर छातीपर्यंत डायफ्रेम नावाच्या पडद्यापर्यंत तो गोळा होता. हि शस्त्रक्रिया अवघड व जीवघेणी होती परंतु डॉ. प्रवीणकुमार पानसरे यांनी हे शिवधनुष्य उचलले. त्यासाठी त्यांना भूलरोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत कासार, सहायक विनोद गाडेकर, ऑपरेशन थिएटर सहायक सतीश दिघे, संजय हलकर यांनी मोलाची साथ दिली. यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार किलोचा गोळा बाहेर काढला. सध्या हि महिला अतिदक्षता विभागात असून, परिस्थिती स्थिर आहे. ही गाठ तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ती गाठ नेमकी कशाची आहे हे स्पष्ट होणार आहे. धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर व वेदना मुक्त झाल्यामुळे सदर महिला व नातेवाईकांनी हॉस्पिटलचे आभार मानले आहे.