इराण-इस्रायल युद्धाच्या झळा संगमनेरला

0
194

गॅस टंचाईमुळे नागरिकांच्या लांबच लांब रांगा, व्यवसाय अडचणीत

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्र सरकारने सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना घरगुती एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिक एलपीजी पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो; मात्र तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या इराण-इस्रायल युद्धाचे पडसाद आता संगमनेरमध्येही उमटू लागले आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले असून शहरात घरगुती व व्यावसायिक गॅसच्या टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी गॅस एजन्सींच्या कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून इंधन पुरवठ्याबाबत सर्व आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र संगमनेरमध्ये नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक नागरिक कामधंदा बुडवून तासनतास उन्हात उभे राहत आहेत. तरीदेखील गॅस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढू लागली आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याच्या चर्चेमुळे या संतापात आणखी भर पडली आहे.
इराणसोबत इस्त्रायल व अमेरिकेच्या संघर्षाला दहा दिवस उलटले असून त्याचे परिणाम इंधन बाजारावर दिसू लागले आहेत. घरगुती गॅसच्या दरात तब्बल 60 रुपयांनी वाढ करण्यात आली असून आता 25 दिवसांनंतरच गॅस बुकिंग करण्याची अट लागू करण्यात आल्याचे नागरिक सांगत आहेत. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठी घट झाल्याने शहरातील छोटे-मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि मिठाईची दुकाने अडचणीत आली आहेत.
गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प झाल्याने अनेक व्यावसायिकांवर व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, केटरिंग व्यवसाय, तसेच पेंटिंग व फॅब्रिकेशनसारखे उद्योगही गॅसअभावी अडचणीत आले आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास मोठ्या उद्योगांनाही त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसमारंभ, जेवणावळी व केटरिंग व्यवसायही ठप्प पडण्याच्या मार्गावर असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
दरम्यान शहरात भारत गॅस, एचपी गॅस आदी कंपन्यांचे वितरक व उपवितरक कार्यरत आहेत. मात्र युद्धामुळे भविष्यात गॅस टंचाई निर्माण होईल या भीतीने नागरिकांनी गॅस भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मालदाड रोड, लिंक रोड व अकोले रोड परिसरातील गॅस एजन्सींसमोर पहाटेपासूनच ग्राहक सिलेंडर घेऊन रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक एजन्सीसमोर शेडची व्यवस्था नसल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना उन्हात उभे राहावे लागत आहे. गॅस वाहतुकीसाठी दुचाकी वाहने रस्त्यावर उभी केल्याने वाहतूक कोंडीही निर्माण होत असून काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या वेगवेगळ्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने सामान्य नागरिक, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्र मोठ्या अडचणीत सापडले आहे. ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती लवकर सुरळीत झाली नाही तर महिलांना पुन्हा चुली पेटवण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here