सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी – आ. खताळ

0
47

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भारताचे कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता आणि एकता अबाधित राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या युगपुरुषांच्या कार्यातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर उपविभाग व संगमनेर शहर पोलीसांच्या वतीने आयोजित एकता दौड स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, विनोद सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्षा पायल ताजणे, तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. खताळ म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर खरी एकात्मता टिकवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. जुनागढ, काश्मीर आणि हैदराबाद या संस्थानांच्या विलिनी करणाच्या वेळी त्यांनी दाखवलेली कणखर भूमिका खर्‍या अर्थाने देशाच्या अखंडतेसाठी ऐतिहासिक ठरली. त्याग, शिस्त आणि राष्ट्रीय एकतेचा आदर्श प्रत्येक भारतीयाने त्यांच्या जीवनातून घ्यावा. असाही सल्ला आ. खताळ यांनी देत पोलीसभरतीसाठी तयारी करत शहरातील विविध अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग पाहून आ खताळ यांनी समाधान व्यक्त केले. आगामी होत असणार्‍या पोलीस भरतीच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी सांगितले की, एकता दौड स्पर्धेमागचा उद्देश म्हणजे भारताची अखंडता आणि एकता टिकवण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.तर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट आणि नियोजन स्पष्ट केले.
अहिल्यानगर पोलीस संगमनेर उप विभाग आणि संगमनेर शहर पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या एकता दौड स्पर्धेत पुरुष गटाची स्पर्धा संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुल ते नाशिक महामार्ग (132 केव्ही अकोले बायपास) या मार्गावर तर मुलींची स्पर्धा संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुल ते कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गावर घेण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here