स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा माहोल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल अखेर वाजला असला तरी निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती, महाआघाडी की अन्य कोणते समीकरण हे सर्व अजून अनिश्चित असतानाही इच्छुकांनी आपल्या उमेदवारीचा झेंडा सोशल मीडियावर उंचावला आहे.
पक्ष ठरला नाही तरी उमेदवारी ठरली बुवा! या आत्मविश्वासाने अनेकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा सोशल प्लॅटफॉर्मवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. काहींनी तर आपल्या प्रभागातील व्यापारी, नागरिक व मतदारांसोबतच्या भेटीगाठींचे फोटो पोस्ट करून आम्ही मैदानात उतरलोय असा संदेश दिला आहे.

सोशल मीडियावर एकच वादा, आणि एकच दादा, विकासाचा ध्यास, आमचा श्वास, नगरसेवकपदासाठी सज्ज, नगराध्यक्षपदासाठी आम्ही तयार अशा घोषणा जोरात उमटत आहेत. काही जणांनी स्वतःची उमेदवारी परस्पर जाहीर करत पोस्टरबाजी व शुभेच्छांचा मोहिमाच राबवली आहे.
पक्षांकडून उमेदवारी मिळण्याआधीच मी का योग्य उमेदवार आहे याचे समर्थन देणारे लेख, व्हिडिओ, संदेश प्रसारित होत आहेत. काहींनी थेट आपल्या नेत्यांना उद्देशून सोशल मीडियावरून मला संधी द्या असा संदेश दिला आहे. काही ठिकाणी इच्छुकांनी शिष्टमंडळे नेत्यांकडे पाठवून आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दरम्यान, काही प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांनी आपल्या सौभाग्यवतींना उमेदवारी जाहीर केली आहे. आता बायकोच्या प्रचारासाठी नवर्याचं पाऊल दारी असे चित्र मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

काहींना मात्र अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. काहींनी खुलेआम पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच, अधिकृत जाहीरातीच्या आधीच संगमनेरमध्ये निवडणुकीचे वातावरण रंगात आले आहे. सोशल मीडियावर उमेदवारी, शुभेच्छा, फोटो आणि पोस्टरबाजीचा धडाका सुरू असून मतदार मात्र या राजकीय गमती-जमतींचा मनमुराद आनंद घेत आहेत.
अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी त्यांना घरात आणि गल्लीत फारशी किंमत नसली तरी सोशल मिडीयावर मात्र ते आज हिरो ठरत आहे. सोशल मिडीयाच्या जमान्यात मतदारही अशाच भुलथांपाना बळी पडत आहे. त्यामुळे मतदारांनी देखील याबाबत सावध असले पाहिजे.






















