पोलीसांना कारवाईसाठी येईना जाग, निष्क्रियतेचे आरोप

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने संपर्क महाराष्ट्र हादरला असताना आणि त्यानंतर अनेक बोगस महाराज, बोगस बाबांचे एक एक प्रकरण बाहेर येत असताना देखील तथाकथित बाबांच्या भक्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. असेच एका बोगस भोंदू बाबाचे एक एक कारनामे आणि कलाकारी बाहेर येत असून अनेकांची श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक होत आहे. मात्र या बाबाच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने त्याचे फावत आहे. त्यामुळे एकीकडे त्यांच्याविरुद्ध जनतेत राग वाढत असून सर्व माहिती असताना देखील पोलीस दखल घेत नाही की त्यांना जाग येत नाही किंवा त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
वडगावपान येथे प्रत्येक गुरुवार व रविवारी या गडगे बाबाच्या दरबार भरतो. आजूबाजूच्या जिल्ह्यास परराज्यातून येथे नागरिक येतात. प्रत्येकाकडून एन्ट्री फी च्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळले जाते. मात्र अनेकांना या बाबाचा कुठलाही फायदा होत नाही. स्थानिक नागरिकांना देखील फायदा होत नाही. त्यामुळे बाबाने पुर्वी सारखे गवंडी काम करावे व लोकांची फसवणूक टाळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक नवीन प्रश्न देखील निर्माण झाले आहे. ताण – तणाव, शारीरिक व्याधी, व्यसन, वाढत्या इच्छा अपेक्षा यामुळे अनेकांच्या जीवनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहे. योग्य मार्गदर्शन व योग्य उपचार याद्वारे यातील काही प्रश्न सुटू शकतात परंतु अनेकदा अनेकांना हे प्रश्न दैवी प्रश्न असून ते बुवा बाबांच्या आश्रमात आणि त्यांच्यामुळेच सुटू शकतात असे वाटते. त्यामुळे अति धार्मिक लोक खरात आणि गडगे बाबांच्या आहारी जातात.
दरम्यान खरात फाईल ओपन झाल्यानंतर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील तथाकथित दत्तधाम नावाने आश्रम चालविणार्या गडगे बाबाच्या एक एका कलाकारीचे नमुने पुढे येऊ लागले आहेत. वडगाव पान येथे या बाबाने अलिशान असे सभामंडपाचा आश्रम उभारला आहे. त्याचबरोबर आजूबाजूला त्याने त्याचेच किंवा त्याच्या चेल्यांचे हॉटेल, मेडीकल उभारले आहे. पिचलेले, संकटग्रस्त लोक तेथे आले असता त्यांच्याकडून काही हजार रुपये एन्ट्री फी घेतली जाते. आणि थातुरमातुर औषध त्यांच्याच मेडिकल मधून घेण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारची दुहेरी तिहेरी लूट सुरू असते. तर या बाबाचेच कार्यकर्ते चक्क तीन ते पाच हजार रुपये घेऊन लवकर नंबर लावून देतात. याचाच अर्थ येथे केवळ पैशांचा, श्रध्देचा बाजार मांडला जात आहे असे दिसते.

वास्तविक माणसांच्या शरीरात अनेक प्रकारचे आजार दडलेले असतात. त्यातला एक गंभीर आजार म्हणजे कॅन्सर. या कॅन्सरच्या निर्मृलनासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमाने औषधोपचार शोधून काढले, अजूनही त्यात रात्रंदिवस संशोधन सुरू आहे. असे असताना दत्तधामचा भोंदू गडगे बाबा ओम शीव…. म्हणून नागरीकांचे कॅन्सर बरे करीत असल्याचे दावे करीत आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे. एखाद्या महिलेचे हात पाय सातत्याने दुखत असेल तरीही ओम शीव.. मंत्र म्हणून बाबा त्यांना बरे करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एखाद्या व्यक्तीची दारू सोडवायची असेल तर सदर बाबा त्याच्या शरीराची, रक्ताची कुठलीही तपासणी न करता गोळ्या दिल्या जातात. मात्र अशा प्रकारचा अघोरी उपचार एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना, अनेक जण याबाबत भीती व्यक्त करीत असताना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील याबाबत तक्रार नोंदविली असताना देखील पोलीस प्रशासनाकडून या बाबांवर कुठलीही कारवाई होत नाही. याचे मोठे आश्चर्य वाटते.

पोलिस असा दावा करीत आहे की आमच्याकडे याबाबत कुठलीही तक्रार नाही मग आम्ही तपास कसा करायचा. वास्तविक महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार पोलीस स्वतः हून दखल घेऊ शकतात. परंतु पोलिसांमध्येच या बाबाचे भक्त असून शकतात त्यामुळे पोलिस दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नाशिकचा खरात बाबा स्त्रीलंपट निघाला त्यामुळे तो फसला. येथे सध्या तरी तसा हा बाबा ज्या प्रकारे बोगस दावे करतो, अंगारा धूपारा देतो, गोळ्या देतो, मंतर मारतो , आर्थिक लूट करतो, मर्सिडीजमध्ये फिरतो हा सर्व गोरख धंदा तो खुलेआम करतो. यावर कुणी अंकुश लागणार की नाही असा प्रश्न आहे. नाहीतर खरात, आसाराम, रामरहिम आशा बाबांसारखा प्रताप केल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न पडतो.





















