शहरात गांजा, हेरॉईनसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- कालपर्यंत दारू, जुगार, गुटखा, मटका इथपर्यंतच मजल असलेल्या संगमनेर शहरात आता थेट घातक ड्रग्स आणि गुन्हेगारीचे केंद्र बनू लागले आहे.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल सोमवारी सायंकाळी शहरातील मालदाडरोड वरील एका वस्तीत केलेल्या कारवाईत साडेचार किलो वजनाच्या गांजासह पहिल्यांदाच शहरातून 72 हजार रुपये किंमतीचा गर्दा (हेरॉईन) जप्त केले आहे. तसेच या छाप्यात चार लाख रुपयांची रोकडही मिळून आली असून अंबादास शांताराम शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, सदरची कारवाई सोमवार एक एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील मालदाडरोड लगत असणार्या शिवाजीनगर परिसरात करण्यात आली. या ठिकाणी गांजा, हेरॉईन असे घातक पदार्थ आणण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी याठिकाणी पाळत ठेवली. हा माल या ठिकाणी आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात शहर पोलिसांसह संयुक्तपणे शिवाजीनगरमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांना अंबादास शांताराम शिंदे (वय 43, रा. शिवाजीनगर) याच्या घरात पांढर्या रंगाच्या पिशवीमध्ये दडवून ठेवलेला 44 हजार 980 रुपये किंमतीचा चार किलो 498 ग्रॅम वजनाचा गांजा व 72 हजार रुपये किंमत असलेला 36 ग्रॅम गर्दा (हेरॉईन) आढळून आले. याशिवाय संबंधित अंमली पदार्थाच्या तस्कराकडे 4 लाख 150 रुपयांची रोकड रक्कम, 50 रूपयांची मोकळी सफेद गोणी, असा एकूण 5 लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व माल पोलिसांनी हस्तगत केला.
शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, हरिश्चंद्र बांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन आडबल यांच्यासह पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी अंबादास शांताराम शिंदे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 325/ 2024, गुंगीकार औषधी द्रव्य आणि मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क) 20 (ब), ळळ 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक पाटील करत आहे.