१५ गावांत मोठ्या नुकसानीचा अंदाज


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर तालुक्यात रविवार, सोमवार दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. सरासरी 15 गावातील अंदाजे 4 हजार 591 नुकसानग्रस्त शेतकर्यांचा समावेश असून प्राथमिक अंदाजानुसार 3 हजार 177.16 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली.
संगमनेर तालुक्यात रविवार (दि.29) व सोमवार (दि.30) रोजी अवकाळी पावसाने अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान केले.

अवकाळी पावसा बरोबर वादळी वार्याने घरांचे गोठ्यांचे पत्रे उडाले. दोन दिवस सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. सध्या शेतात कांदा, मका, गहु इतर भाजीपाला पिका बरोबर डांळीब फळाचा समावेश आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजा नुसार धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, मंगळापुर, निमज, पेमगिरी, निमगाव खुर्द निमगाव बुद्रुक वडगाव लांडगा, राजापूर, चिखली, चिकणी, सायखिंडी, वडगाव लांडगा इतर गावातील पिकांचा समावेश आहे. दोन दिवस झालेल्या नुकसानीचे वेगवेगळे पंचनामे करण्यात आले आहे. रविवारी अवकाळी पावसाने अंदाजे 1006.50 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तर अंदाजे 2 हजार 485 नुकसानग्रस्त शेतकर्यांचा समावेश आहे. तर सोमवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली.

या भागाचे पंचनामे करण्यात आले असून प्राथमिक अंदाजा नुसार 2 हजार 170.96 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 2 हजार 106 नुकसानग्रस्त शेतकर्यांचा समावेश आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने 3177.46 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तर 4591 नुकसानग्रस्त शेतकर्यांचा समावेश आहे. कृषी विभागाचे हे सर्व प्राथमिक अंदाज असल्याचे तालुका कृषी अधिकारी बोडके यांनी सांगितले. हा अहवाल महसूल विभागाला सादर केला जाणार आहे. काही दिवसापूर्वी पाठर भागातही गारपिटीने पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा अवकाळी पावसाने पिकांबरोबर घराचे व मोठ्यांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.





















