आमदार खताळ यांना धक्का

0
250

थोरातांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात होणार सुनावणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे आमदार अमोल खताळ यांना मोठा धक्का बसला असून, बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळण्याची त्यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठासमोर हा निर्णय देण्यात आला. न्यायालयाने खताळ यांचा अर्ज नामंजूर करत, थोरात यांच्या निवडणूक याचिकेवर पुढील सुनावणी घेण्यास परवानगी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे.

या याचिकेत थोरात यांनी 217-संगमनेर विधानसभा मतदारसंघातील 23 नोव्हेंबर 2024 रोजी घोषित झालेल्या निकालावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 100(1)(ब), 100(1)(ड)(ळ) आणि 100(1)(ड)(आयव्ही) अंतर्गत खताळ यांची निवडणूक अवैध ठरवण्याची मागणी केली आहे. तसेच, कलम 101(ब) अंतर्गत स्वतःला निवडून आलेले घोषित करण्याची मागणीही केली आहे.

थोरात यांच्या याचिकेनुसार, खताळ यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत व कर थकबाकीबाबतची माहिती लपवली. ‘नीलकमल’ नावाच्या फर्ममध्ये भागीदारी असूनही ती माहिती जाहीर न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जीएसटी विभागाच्या नोंदीनुसार संबंधित फर्मवर सुमारे 25 हजार रुपयांची थकबाकी असून, व्याजासह ती रक्कम 54 हजार 650 रुपयांपर्यंत गेल्याचा दावा करण्यात आला आहे.यावर बचाव करताना खताळ यांनी आपण त्या फर्मचे सध्याचे भागीदार नसून, फर्म विसर्जित झाल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने जीएसटी संकेतस्थळावरील कागदपत्रांचा दाखला देत फर्म अद्याप सक्रिय असल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदवले. त्यामुळे या टप्प्यावर खताळ यांचा बचाव ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

प्रथमदर्शनी पाहता, लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 100(1)(ब) मधील तरतुदी या प्रकरणात लागू होतात, असे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, राज्यातील विधानसभा व लोकसभा निवडणुकांनंतर दाखल झालेल्या अनेक निवडणूक याचिका प्रारंभीच फेटाळण्यात आल्या होत्या. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने सुनावणी पुढे नेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here