आ. सत्यजीत तांबे यांनी पुन्हा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दिले स्मरणपत्र

संगमनेर (प्रतिनिधी) :
नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा महाराष्ट्राच्या प्रादेशिक तसेच राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा उपक्रम आहे. या प्रकल्पाचा मूळ मंजूर मार्ग कायम ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्मरणपत्र दिले आहे.
या पत्रात आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे की मूळ मार्गानुसार नाशिक – पुणे या दरम्यान सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव व राजगुरुनगर अशा भागातून जातो. या सर्व भागांना औद्योगिक व आर्थिक विकासाची संधी मिळावी यासाठीच मूळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु सध्या प्रकल्पाचा मार्ग शिर्डीकडे वळविण्याचा विचार सुरू असून त्यामुळे हा भाग वंचित राहील. तसेच मूळ मार्गासाठी सुमारे २५ ते ३० टक्के जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मार्ग बदलल्यास मोठा विलंब होईल तसेच स्थानिक शेतकरी व नागरिकांचा देखील विरोध वाढेल.
दि. ९ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीतही हा विषय उपस्थित करण्यात आला होता असे पत्रात नमूद करून तांबे यांनी केंद्र सरकारला मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा व प्रकल्प ‘महा रेल’ मार्फत तातडीने राबवावा अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, शहरी गर्दी कमी होणे व संतुलित प्रादेशिक विकास साधता येईल असा ठाम विश्वासही आमदार तांबे यांनी व्यक्त केला.
या रेल्वे मार्गासाठी तांबे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
- तांबे यांनी वेळोवेळी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली.
- सतत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून नाशिक – पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच ( मूळ मार्गेच) व्हावा यासाठी आग्रही मागणी ठेवली.
- पत्रकार परिषदेतून मार्गबदलाविरोधात तीव्र भूमिका घेत आंदोलन
- सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून सर्व आमदारांचा पाठींबा घेतला.
- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र देत मूळ मार्गावरच प्रकल्प राबवावा, असा ठाम आग्रह धरला.




















