तुमच्या बेगडी हिंदुत्वावर संगमनेरच्या जनतेचा विश्वास नाही – आ. खताळ

1
2454

माजी मंत्री थोरातांच्या मोर्चावर आ. अमोल खताळांचा पलटवार

संगमनेर (प्रतिनिधी)-

तालुक्यातील जनतेनं परावभ करुन तुमचा खुळखुळा केला आहे. तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती आता राहिलेली नाही. तालुक्यातील विकासाची घडी आता चांगल्या पद्धतीने बसत असल्याचे तुम्हाला सहन होत नसल्यामुळेच मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. परंतू तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही. मला कोणी समज देण्याचे सल्ले देण्यापेक्षा भविष्यात राहुल गांधीच तुम्हाला आता समज देवून घरात बसवतील अशी खरमरीत टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.

संगमनेर माध्यमांशी बोलताना आ.खताळ म्हणाले की, माजी आमदारांनी काढलेल्या मोर्चाबद्दल मला कोणतेही भाष्य करायचे नाही. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच घुलेवाडीतील घटनेला राजकीय पार्श्वभूमी मिळाली. कटकारस्थान करुन किर्तनामध्ये त्यांच्या स्विय सहायकानेच गोंधळ घातल्याचा आरोप करुन आज भगवे झेंडे घेवून तुम्ही सहानुभूमी मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरला असला तरी सोयीनुसार हिंदुत्ववाद स्विकारण्याचा तुमचा प्रयत्न जनतेनं केव्हाच ओळखला आहे. यापूर्वी तालुक्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, युवक-युवती यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार घडले त्यावेळी तुमची सद्भवना कुठे गेली होती. सकल हिंदु समाजाचा मोर्चाला विरोध करणारे पत्रक अजुनही जनता विसरलेली नाही. त्यामुळेच अडचणीत आलात की हिंदुत्ववादी असल्याचे दाखवायचे हे संगमनेरी जनता कधीही मान्य करणार नाही.

तालुक्यात कोणतीही गुंडगिरी चालू नाही. विधानसभा निवडणूकीनंतर विकास कामांची घडी चांगल्या पद्धतीने बसत आहे. मात्र ज्यांची राजकीय घडी विस्कटलेली आहे ते मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेले आहे. येथील बाजारपेठ व व्यापार आता मोकळा श्वास घेवून चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पण यापूर्वी व्यापाऱ्यांना बॅकमेल करणारे कोणाचे कार्यकर्ते होते. त्यांना पाठीशी कोणी घातले असा सवाल करुन आमदार खताळ म्हणाले की, डीएनए च्या बाबतीत माजी आमदारांनी केलेले आरोप हे निरर्थक आहेत. माझा डीएनए वारकरी सांप्रदायातला आहे. गेली २३ वर्षे माझी आई वारीला जाते या अर्थाने मी बोललो. परंतू माजी आमदार या विषयाचा गैर अर्थ काढून सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी त्यांनी मला खबऱ्या म्हणून हिणवले नंतर हत्यार म्हणून हिणवले आता कुणाचेतरी खेळणं झाल्याचे ते म्हणतात परंतू जनतेनं तुमचा खुळखुळा केला आता तो वाजवत बसा अशी खरमरीत टीकाही मा.आ.थोरातांचे नाव न घेता केली.

भंडारे महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन नाही. परंतू अध्यात्मिक क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला अतिशय त्रागाने अशा प्रकारचे वक्तव्य करावे लागते हे दुर्देव आहे. आज त्यांच्या सभेमध्ये दाखविण्यात आलेले व्हीडीओ खोडसाळपणे दाखविण्यात आलेले आहेत. टोकनाक्याचे मालक चालक कोण आहेत हे जनतेला चांगलेच माहिती असल्याचे त्याबाबत मला अधिकचे भाष्य करायचे नसल्याचे स्पष्ट करुन आमदार खताळ यांनी सांगितले की, माझ्या नेत्यांनी मला चांगले समजून घेतले आहे. तुम्हालाच आता राहुल गांधी घरात बसण्याची समज देतील असा टोल लगावून रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतून त्यांना अधिकच चांगली समज मिळेल असे आमदार खताळ यांनी ठणकावून सांगितले.

मागील आठ महिन्यांत संगमनेर तालुक्याच्या विकासाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. विधानसभेतही सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज मी उठवत असल्याने याचीच कुठेतरी असुया माजी आमदार आणि त्यांच्या बगलबच्चांना होत असल्यामुळेच व्यक्तीगत पातळीवर माझ्यावर टिका करण्यापलिकडे त्यांच्याकडे कोणतेही भांडवल राहिलेले नाही. सामान्य माणसाच्या सुख-दु:खात मी सहभागी होत आहे. ग्रामीण भागातील समस्याही वेळेत सुटत असल्याने त्यांची चाळीस वर्षांची अपयशी कारकिर्द उघड झाल्याचे शल्य त्यांना आहे. हा तालुका आता अधिक शांत झाला असून, विकास प्रक्रीयेत तो आता थांबणार नाही असे आ.खताळ यांनी ठामपणे सांगितले.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत महायुतीचा भगवा फडकणार आहे. या निवडणूकीत आत्ताच त्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळेच अस्वस्थ झालेले माजी आमदार व त्यांचे कार्यकर्ते हा तालुका अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत हे घुलेवाडी घटनेवरुन उघड झाले. परंतू जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही. आ.सत्यजीत तांबे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याची खिल्ली उडवून ते सत्तेच्या जवळ असल्याचे सांगत असले, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत त्यांनी महायुतीच्या विरोधात प्रचार का केला असा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित केला आहे.

1 COMMENT

  1. एक कीर्तनकार गळ्यात विना घेऊन कीर्तन चालू असताना त्या गादीवर कीर्तन करत असताना ती गादी सोडून तुमच्या पाया पडायला येतो हे तुम्हाला मान्य आहे का आणि हे वारकरी संप्रदायाला मान्य आहे का हे हिंदू समाजाला मान्य आहे का….. माझ्या माहितीनुसार कीर्तनाच्या वेळेस ज्याच्या गळ्यामध्ये विना असतो अशा माणसाला देवा स्वरूप बघितलं जाते…. अशा वेळेस देशाचे पंतप्रधान आले तरी त्यांना अशा विना घातलेल्या माणसाच्या/ महाराजाच्या चरणी नतमस्तकच व्हावा लागते…. तुम्ही त्या गादीचा मान सुद्धा राखू शकत नाही आणि तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार लोकांना…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here