
पहाटे पाचपासूनच या देवस्थानांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रांग
संगमनेर (प्रतिनिधी) – तिसर्या श्रावणी सोमवार निमित्त संगमनेरमध्ये अतिशय पावन समजल्या जाणार्या खांडगाव येथील खांडेश्वर मंदीर, जवळे बाळेश्वर येथील बाळेश्वर देवस्थान, कोकणगाव येथील निझर्णेश्वर मंदीरामध्ये भाविक भक्तांची अलोट गर्दी बघावयास मिळाली. बेलपत्र आणि पवित्र जल वाहण्यासाठी भक्तांनी रांग लावली होती. खांडेश्वर, बाळेश्वर आणि निझर्णेश्वर या पवित्र मंदीर परिसराला जत्रेचे स्वरूप आले असून लहान मुलांसाठी खेळण्या, राहटगाडगे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. दुधापासून बनविलेल्या विविध प्रसादांची दुकाने बघायला मिळाली. पहाटे पाचपासूनच या देवस्थानांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रांग होती. स्थानिक कमिटी आणि ग्रामस्थांनी या मंदीरांच्या सजावटीसाठी विशेष प्रयत्न केलेे. अनेक संस्थांनी यावेळी भाविकांसाठी प्रसादाची सुध्दा व्यवस्था केली.

श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो. याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले. हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात. वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते. तिसर्या श्रावणी सोमवार निमित्त श्रध्दाळू भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. पहाटेच काही व्यक्तींनी पायी प्रवास करून भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा केली. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व विविध मान्यवरांनी विविध मंदिरात पूजा-अर्चा करत महादेवाला साकडे घातले.