संगमनेर महाविद्यालयात कमवा आणि शिका याेजनेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
युवावार्ता (प्रतिनिधी )
संगमनेर – जीवन कितीही कष्टमय व संघर्षमय असले तरी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते. तसेच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. असे आवाहन दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिक्षा योजना कार्यक्रमाअतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून संपादक किसन हासे बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमंत कुरकुटे, नागरे सर उपस्थीत होते. यावेळी बोलताना श्री. हासे म्हणाले, जीवनात प्रत्येकाने श्रम प्रतिष्ठा जपली पाहिजे. श्रमातून मिळालेले यश कायम टिकणारे असते. समोर आदर्श ठेऊन वाटचाल केल्यास यशापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. मूल्य व श्रम प्रतिष्ठा जपली. म्हणून आज ते या सर्वात मोठ्या महाविध्यालयाचे प्राचार्य बनले आहे. स्वतः बद्दल सांगताना ते म्हणाले माझ्या जीवनात रिद्दी, सिद्दी आणि प्रसिद्धी हे तीन शब्द अतिशय मोलाचे ठरले. खडतर परिस्तितीत शिक्षण घेतले. नोकरीं करीत असताना रद्दी गोळा केली, पिशव्या विकणे, रबर स्टॅम्प बनवलं, छपाई उद्योग केला. साप्ताहिक संगम संस्कृती प्रकाशित केले आणि आज दैनिक युवावार्ताच्या माध्यमातून माध्यम क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाज हिताचे अनेक प्रयत्न मांडले, अग्रलेख लिहून पीडितांना न्याय मिळवून दिला. आणि आजही हे काम अविरतपणे सुरु आहे. आजच्या बदलत्या जीवन शैलीत मुलांनी मोबाईलचा गैरवापर टाळावा, ध्येयावर लक्ष्य केंद्रीत करावे. असे आवाहन संपादक हासे यांनी केले. प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आर्थिकदृष्ट्या अडचणीतील, विध्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना सुरु केली. या महाविद्यालयात आणि जवळपास 550 मुले या योजनेत काम करत आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. संस्थेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी यांचेही या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष्य असते. त्यामुळे ही योजना या महाविद्यालयात यशस्वी होत आहे. सूत्रसंचालन प्रतिभा कडनर यांनी तर आभार ईश्वर डुबे यांनी मानले.