जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मागितलेली माहिती तात्काळ दिली नाही म्हणून याचा राग आल्याने ग्रामसेवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले. या प्रकरणातील आरोपीस संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, तालुका अकोले) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, करंडी गावचे ग्रामसेवक सोमा मुरलीधर येडे, पाणीपुरवठा कर्मचारी शशिकांत गोंदके, ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल गोंदके, रोजगार सेवक सोमनाथ वायाळ हे सर्व ग्रामपंचायत करंडी येथे कार्यालयात दैनंदिन काम पहात होते. रोजगार हमी योजनेचा फेर सर्व्हे करावयाच्या असल्याने कृषी सहाय्यक अनिल फापाळे यांच्यासोबत या सर्वांना जायचे होते. त्याचवेळी गावातील दत्तात्रय विठ्ठल गोंदके हा ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि त्याने एक अर्ज देऊन मला तात्काळ माहिती द्या अशी मागणी ग्रामसेवकास करू लागला. तेव्हा ग्रामसेवक सोमा येडे यांनी त्यास समजावून सांगितले की, आता रोजगार हमी योजने संदर्भात सर्व्हे करायचा असल्याने तिकडून आल्यावर तुमची माहिती देतो. मात्र आरोपीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
मला तात्काळ माहिती द्या अन्यथा तुम्हाला ग्रामपंचायती बाहेर जाऊ देणार नाही असे सांगून ग्रामपंचायतचा दरवाजा लावून घेतला व येडे यांना दोन तास कोंडून ठेवले. दोन तासानंतर दरवाजा उघडल्यावर ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर जाऊ लागले असता आरोपी गोंदके याने त्यांच्या छातीत लाथ मारून त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्याने मारहाण करत जखमी केले. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्याची सुनावणी संगमनेर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या युक्तिवादाच्या वेळी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी प्रबळ युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी दत्तात्रय विठ्ठल गोंदके याच्यावर गुन्हा सिध्द झाला. त्यामुळे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपीला तीन महिन्याचा सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदरच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांना पोलीस हवालदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली दवंगे नयना पंडित, प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.