६९.७९ लाखांचा गुटखा जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी (दि. 5) सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरित्या धडक कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा तस्करीविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणार्या एका टेम्पोमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी हिवरगाव पावसा टोलनाका परिसरात सापळा रचला.

संशयास्पद टेम्पो अडवून त्याची कसून तपासणी करण्यात आली असता, वाहनात गोण्यांमध्ये भरून ठेवलेला सुगंधी तंबाखू व गुटखा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. या साठ्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान टेम्पोतील तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, ते राजस्थान व उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
या कारवाईत गुटखा, चारचाकी वाहन, मोबाईल आदींसह एकूण 69 लाख 79 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले की, राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जात असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचे जाळे उघड झाले असून, अशा अवैध व्यवसायांविरोधात प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





















