संगमनेरचा महसूल कर्मचारी ताब्यात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संगमनेर तहसील कार्यालयातील आस्थापना लिपीक म्हणून काम करणार्या कर्मचार्याने मोबाईलवरून शिवीगाळ करून वादग्रस्त संदेश पाठवल्याची घटना घडली आहे. त्यानंतर नारायणगावच्या पोलिसांनी तातडीने संगमनेर येथे येऊन रात्री उशिरा या कर्मचार्यास ताब्यात घेऊन नारायणगावला नेले आहे. या वृत्तामुळे संगमनेर आणि महसूल विभागात खळबळ उडाली असून थेट खासदारांना शिवीगाळ करणारा हा महसूल कर्मचारी कोण याची सर्वत्र चर्चा होत आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, की संगमनेर तहसील कार्यालयामधील एका कर्मचार्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मोबाईलवरून दोन दिवसांपूर्वी शिवीगाळ केली होती.
यानंतर त्याने पुन्हा खासदार कोल्हेंना वादग्रस्त संदेश पाठवला. याबाबत नारायणगाव पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी संगमनेर येथे येऊन शिवीगाळ करणार्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्या मोबाईलवरून शिवीगाळ करण्यात आली तो नंबर पोलिसांना देण्यात आला होता. यानंतर नारायणगाव पोलिसांनी काल संध्याकाळी संगमनेर येथे येऊन शिवीगाळ करणार्याचा शोध सुरू केला. संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरा मोबाईलच्या साह्याने शोध घेतला असता शिवीगाळ करणार्याचे ठिकाण प्रथम संगमनेरच्या क्रीडा संकुलवर दाखविण्यात आले. याठिकाणी तो सापडला नाही. यानंतर पोलिसांनी पुन्हा ठिकाण पाहिले असता वकील कॉलनी परिसरात त्याचे ठिकाण दाखविण्यात आले. नारायणगाव पोलिसांनी वकील कॉलनी परिसरात चौकशी केली असता शिवीगाळ करणार्याचे घर पोलिसांना सापडले.
पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तो झोपलेला होता. पोलिसांनी त्याला उठवून ताब्यात घेतले. शिवीगाळ करण्यात आलेला मोबाईल संगमनेर तहसील कार्यालयात आस्थापना विभागात काम करणार्या कर्मचार्याचा असल्याचे प्राथमिक तपासात समजले. परंतु, आपण फोन केला नसल्याचे या कर्मचार्याने सांगितले. या कर्मचार्याच्या मोबाईलवरून कोणी फोन केला याचा तपास पोलीस करत आहे.
सध्या मोबाईलचा अतिरिक्त वापर सुरू असून सोशल मिडीयाच्या विविध माध्यमातून थेट आमदार, खासदार, मंत्री यांना जाब विचारणे, प्रसंगी शिवीगाळ करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे अशा अनेक गोष्टी सातत्याने घडत आहे. प्रशासनाकडून याविरूद्ध कठोर कारवाई केली जात नसल्याने अशा घटना वारंवार घडतांना दिसत आहे. सरकारी कर्मचारी असूनही थेट खासदारांना शिवीगाळ करणे आता या कर्मचार्याच्या चांगलेच अंगलट येणार असल्याचे दिसत आहे.