लायन सुनिता मालपाणी यांची डिस्ट्रिक्ट 3234-D2 च्या उपप्रांतपालपदी दणदणीत निवड

संगमनेर (प्रतिनिधी) : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234-D2 (पुणे-नाशिक-अहिल्यानगर) च्या लायनिस्टिक वर्ष 2026-27 साठी सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (VDG-2) पदावर लायन सुनिता गिरीश मालपाणी यांची बिनविरोध झालेली निवड ही संगमनेरसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या दणदणीत आणि ऐतिहासिक निवडीमुळे लायन्स चळवळीत संगमनेरच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे. समाजसेवा, संघटन कौशल्य, प्रभावी नेतृत्व आणि संवेदनशील कार्यपद्धती यांच्या बळावर त्यांनी लायन्सच्या माध्यमातून उभारलेले कार्य आज जिल्हाभर प्रेरणादायी ठरत आहे.

लायन सुनिता मालपाणी या लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ संगमनेर सॅफ्रॉन सफायर या प्रतिष्ठित क्लबच्या माजी अध्यक्षा असून, त्यांच्या नेतृत्वकाळात क्लबने अनेक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सायन्स एक्स्पो, सफायर आयडॉल, आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजूंसाठी अन्नधान्य वितरण, पर्यावरण संवर्धन, दिव्यांगांसाठी सहाय्य, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यात सेवाभाव, व्यवस्थापन कौशल्य आणि समाजाप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी सातत्याने दिसून आली आहे.

लायन्स संघटनेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. डिस्ट्रिक्ट GAT Coordinator, GST Chairman, Region Chairperson यांसारख्या महत्त्वपूर्ण पदांवर काम करताना त्यांनी संघटनात्मक विकास, सदस्यवाढ आणि सेवा प्रकल्पांना गती दिली. त्यांच्या प्रभावी संवादशैलीमुळे आणि समन्वय क्षमतेमुळे अनेक सामाजिक उपक्रमांना व्यापक प्रतिसाद मिळाला. महिलांना नेतृत्वाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून, लायन्सच्या माध्यमातून समाजसेवेचे व्यापक व्यासपीठ निर्माण करण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.

त्यांच्या या यशामागे उद्योग, शिक्षण, आणि समाजसेवा क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व मा. गिरीशभाऊ मालपाणी यांची प्रेरणादायी साथ लाभली आहे. गिरीशभाऊ मालपाणी हे लायन्स चळवळीतील अत्यंत प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. लायन्स क्लब ऑफ संगमनेर सॅफ्रॉन सफायर चे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी क्लबची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून उल्लेखनीय कार्य करत लायन्स चळवळीला नवी दिशा दिली. लायन्स इंटरनॅशनलचे मल्टिपल कौन्सिल चेअरमन या प्रतिष्ठेच्या पदावर अत्यंत प्रभावीपणे कार्य केले. भारतातील लायन्स चळवळीतील एक प्रभावी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले असून, सेवा, संघटन आणि नेतृत्व यांचा उत्कृष्ट समन्वय त्यांनी साधला आहे. मालपाणी दाम्पत्याने समाजसेवा आणि लायनिझमच्या माध्यमातून उभे केलेले कार्य आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

लायन सुनिता मालपाणी यांच्या निवडीमुळे संगमनेरच्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे बळ मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डिस्ट्रिक्ट 3234-D2 ला नवी दिशा, अधिक प्रभावी सेवा प्रकल्प आणि सामाजिक परिवर्तनाची नवी उंची लाभेल, असा विश्वास लायन्स परिवार आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संगमनेर शहर व तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि सेवाभावी संस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. समाजसेवेच्या माध्यमातून नेतृत्वाची नवी उंची गाठणाऱ्या लायन सुनिता मालपाणी यांची ही निवड अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.






















