भावजयीवर जीवघेणा हल्ला! आरोपीला पोलिस कोठडी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा विनयभंग करून तिच्या आईवरच जीवघेणा हल्ला करणार्या नराधम चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष शंकर राऊत (वय 34, रा. घुलेवाडी, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल 2026 रोजी ही भीषण घटना घडली. फिर्यादी महिला आपल्या अवघ्या 3 वर्षे 5 महिन्यांच्या मुलीला आंघोळ घालून बेडवर ठेवून स्वतः आंघोळीला गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी संतोष राऊत याने निष्पाप बालिकेच्या गुप्तांगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला.

महिला बाथरूममधून बाहेर आल्यानंतर तिच्या डोळ्यांसमोर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. तिने आरोपीला जाब विचारला असता, त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिच्याशीही गैरवर्तन केले. इतकेच नव्हे, तर मी तुझ्या मुलीशी संबंध ठेवीन अशी अमानुष धमकी देत तिच्यावर हल्ला चढवला. आरोपीने तिच्या छातीवर दाब देत तिला जोरात ढकलले, तसेच घरातील चाकूने वार करण्याचाही प्रयत्न केला. रागाच्या भरात त्याने पाण्याचा माठ तिच्या अंगावर फेकून मारला. महिलेच्या आरडाओरड्यामुळे शेजारी तातडीने धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पीडित महिलेने त्वरित संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 300/2026 अंतर्गत आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवले.

आरोपीवर भारतीय नागरिक संहिता 2023 मधील कलम 64(2)(I)(F), 65(2), 74, 75, 118(1), 351(2), 352 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून अकोले येथून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. 14 एप्रिलच्या मध्यरात्री त्याला अधिकृत अटक करण्यात आली. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित करत सखोल तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी प्रकरणाचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन आरोपी संतोष राऊत याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात वापरलेला चाकू जप्त करणे, पीडित बालिकेच्या अंगावरील कपडे ताब्यात घेणे तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे अद्याप बाकी असून तपास सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे संगमनेर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल करत आहेत.






















