माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

संगमनेर (दि. १७ मार्च २०२६) – संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात घडलेल्या अमानुष अॅसिड हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर अज्ञात इसमाने अॅसिडसदृश्य द्रव फेकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
पीडित विद्यार्थिनी कु. ईश्वरी संजय डहाळे (वय १३) ही मंगळवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर महादेव मळा परिसरातील कच्च्या रस्त्याने सायकलवरून घरी जात असताना हा प्रकार घडला. हाडकीचा ओढा परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अंदाजे ३२ ते ३५ वयोगटातील अज्ञात इसमाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या बाटलीतील अॅसिडसदृश्य द्रव तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूस फेकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या भीषण हल्ल्यात ईश्वरी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने लोणी (ता. राहाता) येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर जनरल फिजिशियन, प्लास्टिक सर्जन आणि नेत्रतज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १२६/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम १२४(१), १२६(२) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी दहा विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये गुन्हे शोध पथक (अहिल्यानगर), फॉरेन्सिक युनिट (संगमनेर), सायबर टीम तसेच संगमनेर शहर व तालुका पोलीस यांचा समावेश आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.
तपासादरम्यान साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून ते सार्वजनिक करण्यात आले आहे. या रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कोणाकडेही खात्रीशीर माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या अमानुष घटनेविरोधात वडगावपान परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे





















