युवावार्ता कोणाचाही बटीक नाही – वाचक हेच आमचे दैवत आणि शक्ती
कोंबही न फुटलेल्यांनी आम्हाला पत्रकारिता शिकवू नये

युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी) –
संगमनेर शहरात बसस्थानक परिसरात भव्य कमानी उभारल्यानंतर व फ्लेक्सबाजी वाढल्यानंतर नागरिकांना व वाहतूकीस होणाऱ्या त्रासाची बातमी दैनिक युवावार्ताने प्रसिध्द केली. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुढीपाडवा सण अतिशय मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजऱ्या झाल्याच्या बातम्याही आम्ही प्रसिध्द केल्या आहेत. 6 एप्रिल रोजी होणारा प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या बातम्याही भव्य स्वरूपात प्रसिध्द होतीलच. एखाद्या कार्यक्रमाचे अथवा उपक्रमाचे अतिशय सुंदर वार्तांकन फोटोसह केले तरी त्याचे कौतुक होईलच असे नाही मात्र रहदारीतील अडथळा, अतिक्रमणे, त्रासदायक फ्लेक्सबाजी आणि अवैध व्यवसायाच्या बातम्या आम्ही वेळोवेळी प्रसिध्द करीत असतो. त्यामध्ये नेता कोण आहे, मंत्री आहे का आमदार आहे याची काळजी आम्ही करीत नाही. अवैध व्यवसाय, अतिक्रमण किंवा फ्लेक्सबाजीच्या बातम्या दिल्या की संबंधितांना वाईट वाटते आणि सोशल मीडियावरून आमच्यावर टीका होते.
आमचे नसलेले सामाजिक, राजकीय हितसंबंध जोडले जोतात हे वाईट आणि हास्यास्पद आहे. सारासार विवेकबुध्दीने सार्वजनिक व सामाजिक सुविधांसाठी आम्ही वार्तांकन करीत असताना दहा हितचिंतकांचे योग्य केले सांगणारे फोन येतात तसेच काही अवास्तव टीका करणारे समाज माध्यमांवर भेटतात. कोणाचे हितसंबंध दुखावल्यास वास्तव वार्तांकन करत असताना झालेल्या टीकेचाही आम्ही स्वीकार करतो. प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करीत असताना मिळालेल्या शुभेच्छा किंवा झालेली टीका दोन्हीही समान समजून आम्ही वाटचाल करीत आहोत.
फ्लेक्स संदर्भात अवास्तव टीका करणाऱ्यांना आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की, रस्ते, पाणी, वीज, वाहतूक, दफ्तर दिरंगाई यासंदर्भात दैनिक युवावार्ताने केलेल्या वार्तांकनामुळे सकारात्मक बदल झाले तसेच नागरिकांचे आम्हाला अभिप्रायही मिळाले. टीकाकारांनी आम्हास पाकीटे मिळाली असतील येथपर्यंत मजल मारली. त्यांना आम्ही सांगू इच्छितो 40 वर्षांच्या पत्रकारितेच्या वाटचालीत पाकीटे, हप्ते आणि ब्लॅकमेलिंग ज्यांना आठवत असतील त्यांना लखलाभ होवोत. अशाच प्रकारची अवास्तव टीका यापूर्वी झाली त्यावेळी “आम्ही कोणाचे बटीक नाही” असे ठणकावून सांगितले होते. काहींच्या अवास्तव बातम्या प्रसिध्द करणे शक्य नसल्याने आम्ही त्यांच्या जाहिरातींचाही त्याग केला आहे. सामाजिक प्रबोधन, परिवर्तन आणि लोक शिक्षणाच्या विचारांनी वाटचाल करीत असताना उपक्रमशीलता हा आमचा स्थायीभाव आहे. संगमनेर, अकोले शहर व तालुक्याच्या विविध उपक्रमात आम्ही सक्रीय असतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, हनुमान जयंती, प्रभु श्रीराम जन्मोत्सव, गणेशोत्सव, नवरात्र या उत्सवात सक्रीय सहभागी असतो. आपल्या श्रध्दा, भावना मनाच्या गाभाऱ्यात जपत असताना सहभागही आम्ही देत असतो यांची नोंद टीकाकारांनी घ्यावी. सर्वांसाठी जय श्रीराम..जय शिवराय
कोंबही न फुटलेल्यांनी आम्हाला पत्रकारिता शिकवू नये
तत्कालीन महसूलमंत्र्यांच्या कार्यकाळातील 11-12-2022 रोजीची बातमी
फ्लेक्स अतिक्रमाणाच्या बातमीत कोणत्याही नेत्याचा, संघटनेचा उल्लेख आम्ही केला नाही. वाहतुकीसाठी अडचण होत असताना नव्याने सुरू झालेल्या कमानीसंदर्भात आम्ही बाजू मांडली. फ्लेक्स जरूर लावावेत पण त्याचा रस्त्याच्या रहदारीला त्रास होणार नाही यांचे भान ठेवावे. शिवजयंतीनंतर कमान पडल्याचीही घटना घडली. याआधीही ट्रकचा धक्का लागून स्टँडसमोर एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सुध्दा आक्रमक बातमी टाकून तेथील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही प्रवृत्त केले. यापूर्वीचे सत्ताधारी, मंत्री किंवा नगराध्यक्ष असतानाही आम्ही अतिक्रमण, अवैध धंदे, गोवंश हत्या, खराब रस्ते, कचरा विल्हेवाट यांसंदर्भातील बातम्या टाकल्या आहेत. त्याचे अगदी तारखेनुसार पुरावेही आम्ही देऊ शकतो. आता बातमी टाकल्यानंतर काहींनी हिंदुविरोधी किंवा पाकीट घेणारे म्हणून उल्लेख केला. अजून कोंबही न फुटलेल्यांनी आम्हाला पत्रकारिता शिकवू नये. घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकास दिलेले असले तरी या स्वातंत्र्याचा स्वैराचार करून कोणाचे नुकसान होणार नाही याचे भान ठेवून रहावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.