बेशिस्त वाहतूकीचा आठवड्यात दुसरा बळी
युवावार्ता (प्रतिनिधी) – दुचाकीवरून तिघे तरुण जात असताना डंपरचा धक्का लागून डंपरखाली सापल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज सोमवारी दुपारी चारच्या सुमारास दिल्ली नाक्यावरील अलका फ्रुट जवळ घडला. विजय उर्फ बंटी केणेकर (रा.रंगारगल्ली) असे अपघातात ठर झालेल्या तरुणाचे नाव असून तो दिवेकर गॅस एजन्सीमध्ये वितरण कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
याबाबत समजलेली माहिती अशी, आज सोमवार (२९) रोजी दुपारी चारच्या सुमारास दिल्ली नाका या नगररस्त्यावरील अतिशय रहदारीच्या रस्त्यावर खासगी वाहतूकदारांमुळे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच या ठिकाणी रस्यांवर खड्डे असल्याने या ठिकाणी वाहतूक नेहमीच धोकादायक असते. ज्ञानमाता विद्यालय देखील जवळच असल्याने या रस्त्यावर विद्यार्थांची वर्दळ देखील मोठी असते.
दरम्यान आज दुपारी मयत बंटी केणेकर आपल्या अन्य दोन मित्रांसोबत दुचाकीवरुन नगर रस्त्यावरुन नवीन नगररोडकडे वळण घेत असताना सदरचा भिषण अपघात घडला. रस्त्याती वाहनांमुळे अंदाज न आल्याने केणेकर याच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागून ते तिघेही खाली पडले. दुर्दैवाने या घटनेत विजय उर्फ बंटी केणेकर हा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा यात जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन्ही मित्र बालंबाल बचावले.
या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेत मयत केणेकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी काॅटेज रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर महामार्गावर दोन्ही बाजूने मोठी वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घडलेल्या अपघातात आठ दिवसांपूर्वी एका महिलेचा बळी गेला होता. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील बेशिस्त वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.