बस थांब्यावर मिळणार ३० रुपयांत चहा – नाष्टा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पुणे – नाशिक महामार्गावरील धाब्यांवर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस ज्या ठिकाणी थांबत होत्या त्या ठिकाणी सदर हॉटेल चालक मनमानी पध्दतीने प्रवासी ग्राहकांची लुटमार करत होते. राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनांचे या हॉटेल चालकांकडून पालन केले जात नव्हते. खाद्य पदार्थ बाबतही योग्य नियम पाळत नव्हते. याबाबत संगमनेर येथील अण्णा काळे, ज्ञानेश्वर गायकर, अजित मणियार आदी प्रवाशांनी या बाबत पुराव्यासह तक्रार दाखल करत हॉटेल फाउंटनवर तात्काळ कारवाईची मागणी केली होती. एसटी महामंडळाकडून याची दखल घेत संबंधित हॉटेल चालकाला नोटीस देत प्रवासी ग्राहकांना योग्य किमतीत व नम्र सेवा देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने नाशिक पुणे महामार्गावर ठरवून दिलेल्या हॉटेलवर एसटी बसेस थांबतात. मात्र या ठिकाणी हॉटेल चालक प्रवासी ग्राहकांडून चहा, नाष्टा, जेवण यासाठी अतिरिक्त पैसे घेतले जाते. त्यातही या खाद्यपदार्थाची गुणवत्ता नसते. या संदर्भात वरील प्रवासी नागरीकांनी याबाबत थेट मुख्यमंत्री, मुख्य सरव्यवस्थापक, पुणे विभागीय निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याबाबतचे पुरावे देखील त्यांनी दिले होते. यासर्व बाबींचा तपास राज्य परिवहनचे अधिकारी श्री. आगाव यांनी करुन सर्व धाबा चालकांना नोटीस बजावली होती. धाबा चालकांची अरेरावी या नोटीसीद्वारे संपुष्ठात आली असून सर्व एसटी प्रवाशांना आता तीस रुपयात चहा, नाश्ता मिळणार आहे. या अगोदर हे धाबा चालक सत्तर रुपये ग्राहकांडून वसूल करत होते. या हॉटेलमध्ये सर्व ठिकाणी ठळकपणे लावण्याची सूचना देण्याची मागणी श्री. गायकर यांनी महामंडळाचे अधिकारी कदम यांच्याकडे केली होती. याची दखल घेत या सुचना तात्काळ आमलात आणण्याची सूचना सर्व धाबा मालकांना देण्यात आली आहे. प्रवासी संघटना जागृत असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे एसटी धाबा चालकांची अरेरावीला अटकाव लागला आहे असे श्री. गायकर यांनी म्हटले आहे. या वेळी तक्रारदारांच्या वतीने एसटी अधिकारी यांना धन्यवाद देण्यात आले असून लवकरच एसटी अधिकार्यांचा विशेष सत्कार करणार असल्याचे अण्णा काळे यांनी सांगितले. प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन संगमनेर एसटी प्रवासी महासंघाने केले आहे.
नाशिक-पुणे यासह लांब पल्ल्याच्या मार्गावर महामंडळाकडून बस चालक व प्रवाश्यांसाठी काही हॉटेल व धाबे ठरवून दिलेले आहेत. मात्र या धाब्यांवर बसेस ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ थांबतात. तसेच या धाबे चालकांकडून प्रवाश्यांना पाणी, चहा, नाष्ट्यासाठी अतिरिक्त दर लावून त्यांची एकप्रकारे अर्थिक लुट केली जाते. अनेकवेळा हे समोर आले असतांना कारवाई होत नव्हती. मात्र येथील जागरूक प्रवाश्यांनी पुढाकार गेतल्याने यावर आता निर्बंध येतील.