Monday, March 4, 2024

आप याँद बहोत आओगे

दिग्गज कलाकारांना मानाचा मुजरा

मानवी जीवनात मनोरंजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे मनोरंजन हे मानवाच्या आदिम काळापासूनच सोबतीस आहे. मनोरंजनामुळे मानवाच्या जीवनात आनंदाचे उधाण येत असते. आज भारतीय मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी मनोरंजनाच्या दृष्टीने विश्वात सर्वांत अधिक समृध्द मानली जाते. त्याचे श्रेय भारतीय कलावंताच्या उत्कृष्ट अभिनय कलेला द्यावे लागेल. आज मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत आपल्या दमदार अभिनयामुळे मानवी जीवनास प्रोत्साहन देत आहेत. प्रत्येक युगात या कलावंतांनी आपल्या दर्जेदार, सोज्ज्वळ, उत्तम अभिनयाने , उत्कृष्ट संवाद शैलीने आपल्या अभिनयाची जादूने आपला विशेष प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. या अभिनेत्यांच्या सशक्त अभिनय कौशल्यामुळे हे कलावंत आपल्या युगाचे माईल स्टोन ठरले आहेत आणि ठरत आहेत.
परंतु 2023 चे संपूर्ण वर्ष सर्व रसिक प्रेक्षकां साठी व कलाविश्वा साठी शोकमग्न करणारे व दुःखदायी ठरले आहे. या वर्षभरामध्ये भारतीय सिने सृष्टीतील व टेलिव्हिजनच्या मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलावंतांनी अचानक या जगाचा निरोप घेतला आहे. ते त्यांच्या पश्चात त्यांच्या कलेच्या अभिनयाची शिदोरी रसिक प्रेक्षकांसाठी मागे ठेवून गेले आहेत. चित्रपटसृष्टी, नाटक विश्व ,मालिका सृष्टीतील गाजलेले सुप्रसिध्द अनेक कलावंत, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
प्रत्येक कलाकाराची नाळ प्रेक्षकांसोबत जोडली गेलेली असते. या कलाकार मंडळींचे समाजात अनेक चाहते असतात मात्र यंदाच्या वर्षात एका मागे एक सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत हरपले आहेत. देव इतका का निष्ठूर झाला? की त्याने एका पाठोपाठ एक अशा अनेक कलावंतांना चाहत्यांपासून हिरावून घेतले. कदाचित देवाला त्याच्या मनोरंजनाच्या दरबारात मनोरांजन करणार्‍या या कलावंतांची आवश्यकता भासली असावी.
2023 या वर्षात अनेक दिग्गज कलावंतांनी या जगाचा निरोप घेतला ज्यांनी संपूर्ण आयुष्य या भारतीय हिंदी- मराठी चित्रपट सृष्टीला बहाल केले होते. हे सर्वच कलावंत अत्यंत सामान्य आयुष्य जगत होते.

सदाबहार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी…


सुलोचना दीदी म्हणजे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले एक सोज्ज्वळ स्वप्न होय. सुलोचना दीदी यांनी आपल्या दमदार,उत्तम, व सोज्ज्वळ अभिनयाच्या माध्यमातून या मराठी चित्रपटसृष्टी वर 70 वर्षे अधिराज्य गाजवले. सदाबहार अभिनेत्री,एक उत्तम आई म्हणून दीदींनी मराठी चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनेत्री म्हणून आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. कुठल्याही अभिनयाच्या फॅक्टरीत अभिनयाचे प्रशिक्षण न घेता त्यांनी आपल्या उत्तम आणि साज्ज्वळ अभिनयाच्या जोरावर 70 वर्ष आपल्यातला कलाकार सहज जिवंत ठेवून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. सुलोचना दीदींचे गाजलेले चित्रपट म्हणजे वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकरी, धाकटी जाऊ अशा एक नव्हे तर 250 चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण केले.त्यांच्या या उत्तम अभिनयामुळे त्यांना अनेक पुरस्कारांसोबतच राष्ट्रीय पारितोषिक ही प्राप्त झाले. अशा या उत्तम कलावंत व ज्येष्ठ अभिनेत्री व मराठी चित्रपट सृष्टीतील मातेने ने वयाच्या 94 व्या वर्षी म्हणजेच 4जून 2023 रोजी या कलाविश्वाचा निरोप घेतला.

उमदा कलावंत रवींद्र महाजनी…


ज्यावेळी महाराष्ट्र नसून बॉम्बे राज्य होते त्यावेळी 7 ऑक्टोबर 1946 रोजी बेलगाम शहरात या अवलिया कलाकाराचा जन्म झाला. खडतर आयुष्याशी सामना करत प्रसंगी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत यांनी आपल्या आयुष्याची सुरूवात केली. जन्मजात अभिनयाचे वेड असल्याने त्यांच्यातला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता . एकदा सहजच त्यांनी ऑडिशन दिली आणि या मराठी चित्रपट सृष्टीला एक अस्सल हिरा सापडला. उत्तम सौंदर्य, उंच आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व, उत्तम अभिनय आणि प्रभावी संवाद फेक या गुणांमुळे रवींद्र महाजनी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या नावाचं वलय निर्माण केलं. मराठी चित्रपटसृष्टीतले विनोद खन्ना म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. रवींद्र महाजनी यांनी अंकुश, मुंबईचा फौजदार, देवता, कळत-नकळत, आराम हराम, देऊळ बंद अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा जनसामान्य प्रेक्षकांमध्ये निर्माण केला. त्यांचा ‘लक्ष्मीची पाऊले’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यांच्या दर्जेदार अभिनय कौशल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. फिल्मफेअर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेता पुरस्कार, कला गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कलेचा सन्मान करण्यात आला. आयुष्याच्या शेवटी त्यांनी ‘पानिपत’ सारख्या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटात ही आपल्या उत्तम भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. अशा या अवलिया कलाकाराचा अंत मनाला चटका लावून गेला. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी 11 जुलै, 2023 या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनी या अवलिया कलाकाराच्या मृत्यूची बातमी कलाविश्वाला कळाली.

जयंत सावरकर…


‘रंगभूमी आणि नाटक माझा प्राण आहे’ असे सतत म्हणणारे आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजेच 88व्या वर्षापर्यंत नाटक आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चिरतरुण भासणारे ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर. खर्‍या अर्थाने नाटक जगणारे आणि जगवणारे जयंतजी नेहमी म्हणायचे. ‘मला नाटकानेच आजपावेतो जिवंत ठेवले आहे.’ रंगभूमीशी एकनिष्ठ असणारे हाडाचे कलावंत म्हणून ज्यंत सावरकर यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीत आपला एक अनोखा चाहता वर्ग निर्माण केला. त्यांनी पोलीस लाईन, हरिओम विठ्ठला, विघ्नहर्ता, इजा बिजा तिजा, गडबड गोंधळ, जावई माझा भला, रिंगा रिंगा, येड्यांची जत्रा या उत्तमोत्तम मराठी चित्रपटांसोबत कुरुक्षेत्र, गुलाम – ए- मुस्तफा, बडे दिलवाला, युगपुरुष, वास्तव, सिंघम अशा अनेक दर्जेदार हिंदी चित्रपटां मधून व अनेक नाटकांमधून आपल्या रुबाबदार अभिनयाने रसिक प्रेक्षकाच्या मनावर गारूड निर्माण केले. मराठी सोबत हिंदी चित्रपट सृष्टीला न्याय देणारे उत्तम कलावंत म्हणून जयंत सावरकर हे एक अजब कलावंत होते. त्यांनी फुलपाखरू, आई कुठे काय करते, तुमची मुलगी काय करते अश्या अनेक टी व्ही मालिकांमधून ही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांच्या या अफलातून अभिनय सेवेमुळे त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा नाट्य गौरव पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अशा या 88 वर्षाच्या अभिनयाने तरुण असणार्‍या कलावंताचे अभिनय करता करता 24 जुलै, 2023 रोजी अकस्मात निधन झाले.

‘शो मॅन’ कला दिग्दर्शक नितीन देसाई…


प्रत्येक चित्रपटात पडद्यावर सुंदर दिसणारे चित्र पडदयामागे उभे राहून त्याला सुंदर पद्धतीने साकारणारे हे कलाकारच असतात. अश्याच कलाकारांपैकी उत्तम निरीक्षण, उत्तम व्हिजन असणारे महाराष्ट्रातील ‘मेगा शो मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले कला दिग्दर्शक नितीन देसाई. नितीन देसाईंचा जीवन प्रवास खडतर असाच राहिला. सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या अवलिया कलाकाराला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून कला दिग्दर्शनाचा संस्कार लाभला आणि एका सामान्य मराठी कलाकाराने उघड्या डोळ्यांनी पाहिलेले भव्य-दिव्य अशा एन डी स्टुडिओ चे स्वप्न पूर्ण करून इतिहास घडवला आणि आपल्यातल्या उत्तम कलाकाराची व कला दिग्दर्शकाची ओळख संपूर्ण चित्रपट सृष्टीला करून दिली. हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर अशा एक ना अनेक भव्य चित्रपटांनी जे प्रचंड यश मिळवले त्यात नितीन देसाईंच्या भव्य-दिव्य सेट चा खूप मोठा वाटा आहे. नितीन देसाई यांनी हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीत अनेक मोठ्या शोचे कला दिग्दर्शन करून त्यांनी अनेक रेकॉर्ड स्थापित केले. दरवर्षी लालबागच्या राजाचा आकर्षक देखावा त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असे. लालबाग राजाचा निस्सीम गणेश भक्त असलेला हा अवलिया कलावंतसुद्धा चित्रपट सृष्टीतील दबावाच्या राजकारणाचा बळी ठरला. 2 ऑगस्ट, 2023 रोजी महाराष्ट्रातील मराठी हिंदी चित्रपट सृष्टीने एका उत्तम कला दिग्दर्शकाला गमावले आणि अनेक रसिकांच्या मनाला चटका लावणारी कायम स्वरुपी एक्झिट या गुणवान कला दिग्दर्शकाने कलामांचावरून घेतली.

सालस आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव


नलिनी सराफ अर्थात सीमा देव 1957 साली प्रदर्शित झालेल्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून सीमा देव यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. आपल्या उत्कृष्ट आणि सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर त्यांनी अभिनयाचे नव – नवीन उच्चांक स्थापित केले. मराठी चित्रपसृष्टी सोबत त्यांनी त्या काळात हिंदी चित्रपटामध्ये आपल्या समृध्द अभिनयाने आपले सर्वोच्च स्थान निर्माण केले. आपला चाहता वर्ग निर्माण करणार्‍या अभिनेत्रीं मध्ये सीमा देव या सर्वश्रेष्ठ ठरल्या. ‘आनंद’ या चित्रपटातील बाबू मोशाय या राजेश खन्ना यांच्या संवादाइतकाच गाजलेला सीमा देव यांचा सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांना सुखावून गेला. आनंद (हिंदी), जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला अशा अनेक मराठी चित्रपटातल्या त्यांच्या दर्जेदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांच्या या अभिनय कौशल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आपल्या अवीट अशा अभिनयातून अमिट छाप निर्माण करणार्‍या सीमा देव यांनी वयाच्या 81व्या वर्षी अल्झायमर या आजारामुळे कलेच्या दुनियेतून 24 ऑगस्ट, 2023 रोजी कायम स्वरुपी निरोप घेतला.

यशापासून उपेक्षित असलेला उत्तम कलाकार मिलिंद सपई…


मराठी चित्रपट सृष्टीत अनेक कलावंत आहेत ज्यांनी अनेक वर्ष आपला दर्जेदार अभिनय करून मनोरंजनाच्या क्षेत्रात अनमोल असे योगदान दिले आहे.परंतु अशा कलावंताच्या जीवनात त्यांना त्यांच्या क्षमते एवढी कधीच प्रसिध्दी लाभली नाही. मराठी मालिका कला विश्वातील मिलिंद सपई यांनी अनेक मालिकां मधून आपल्या दर्जेदार अभिनयाच्या माध्यमातून उत्कृष्ट अभिनयाची छाप निर्माण केली. आई कुठे काय करते, आशीर्वाद एकविरा आईचा, पुढचे पाऊल, सांग तू आहेस का? या अशा अनेक सुप्रसिद्ध मराठी मालिकांच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाच्या कौशल्यावर एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला अशा मिलिंद सपई यांना 25 ऑगस्ट, 2023 रोजी कर्करोगाशी झुंज देताना अपयश आले आणि मराठी मालिका विश्वाने एक उत्तम कलाकार गमावला.

चतुरस्र अभिनेता सतीश कौशिक…


हिंदी चित्रपट सृष्टीतील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक,निर्माता, हास्य अभिनेता,पटकथा लेखक असा चतुरस्र अवलिया कलाकार सतीश कौशिक. 1987 साली अद्भुत आणि चमत्कारिक कथा घेऊन आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाचा सहायक अभिनेता व निर्माता अशा दुहेरी भूमिकेत सतिश कौशिक यांनी या चित्रपट कला विश्वात पदार्पण केले. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाने उत्तुंग यश साध्य करून अनेक रेकॉर्ड स्थापित केले आणि सतीश कौशिक यांना आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग सापडला. हम किसी से कम नहीं या चित्रपटातील पप्पू पेजरच्या विनोदी भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. छोटा चेतन, परदेशी बाबू, दिवाना मस्ताना, अंदाज, जमाई राजा, स्वर्ग, राम लखन, मिस्टर इंडिया तेरे नाम, प्रेम, रूप की रानी चोरों का राजा, अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांच्या माध्यमातून सतीश कौशिक यांनी आपले अनोखे कलाविश्व निर्माण केले. हम दिल दे चुके सनम म्हणता म्हणता 9 मार्च2023 रोजी या उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शकाने स्वतःचे दिल या कला विश्वाला अर्पण केले. ह्रदय घाताने या कला विश्वाचा त्यांनी अचानक आणि कायम स्वरुपी निरोप घेतला.
2023 या संपूर्ण वर्षात या सर्वगुणसंपन्न कलावंताच्या अचानक जाण्याने मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली आहे जी कदापि भरून निघणार नाही असे कलावंत पुन्हा होणे नाही. या सर्व दिग्गज कलावंतांच्या अनुपम कलेला त्रिवार अभिवादन !

  • डॉ. जितेंद्र पाटील
    लेखक संगमनेर महाविद्यालय येथे प्राध्यापक असून
    चित्रपट आणि गायन क्षेत्रात विशेष रूची आहे.
    9860286123

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

‘पाहिजे त्या’ सुविधा मिळेना,कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन

तहसीलदार धीरज मांजरे यांनी या घटनेची गंभीर दखलसंगमनेरचे कारागृह नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत...

आशा सेविकांचा घंटानाद आंदाेलनातून सरकारला इशारा

संगमनेरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात गेल्या पाच दिवसांपासून चुलबंद आंदोलनसंगमनेर - विविध...

प्रतिक्षा होती रेल्वेची, गती मात्र द्रुतगती महामार्गाला

संगमनेरच्या विकासाला मिळणार दुहेरी गती ?तालुक्यातील या गावातून जाणार महामार्ग

रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे कार्य अभिमानास्पद

माजी अध्यक्षांच्या सन्मानार्थ आयोजित सोहळ्यात रोटरी डिस्ट्रीक्ट 3132 च्या प्रांतपाल स्वाती हेरकळ यांचे गौरोद्गार

अत्याधुनिक उपचारांचे ‘एसएमबीटी मॉडेल’ ठरणार देशात आदर्श – डॉ रघुनाथ माशेलकर

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट शानदार भूमिपूजन सोहळा; चार सेवांचा दिमाखात शुभारंभएसएमबीटी व टाटा उभारणार...