साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर लेखक विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी माधव कौशिक यांची निवड; रंगनाथ पठारे यांचा पराभव

दैनिक युवावार्ता
संगमनेर (प्रतिनिधी)

साहित्य क्षेत्रातील सगळ्यात प्रतिष्ठित संस्था मानली जाणारी साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज सकाळी पार पडली आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर लेखक विश्वास पाटील यांची निवड झाल्याने मराठी वाचक प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री. विश्वास पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे साहित्यिक योगदान, विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या कादंबरीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या कादंबऱ्या यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या ‘पानिपत’, ‘महानायक’ आणि ‘संभाजी’ या कादंबऱ्या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अमेझॉन कंपनीने तर ‘झाडाझडती’ ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे. त्यांना या आधी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शनी नॅशनल अवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे साठहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या बत्तीस वर्षांत प्राप्त झाले आहेत. पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिकांनी जाहीरपणे केला आहे. राज्य शासनाच्या सेवेत असताना आय.ए.एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षं रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले. मराठी व इंग्रजी भाषेतील एक उत्तम वक्ते म्हणून श्री. पाटील यांनी लौकिक मिळविला आहे. शिवाय दिल्ली, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर आदी शहरांतील लिटररी फेस्टिव्हल व इतर साहित्यविषयक समारंभांमध्ये आपल्या साहित्याचे व भाषेचे दर्शन घडविले आहे.

श्री पाटील यांना वयाच्या 32 व्या वर्षी त्यांच्या “झाडाझडती” या कादंबरीस मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. अलीकडेच त्याना आसामच्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . त्यांच्या “झाडाझडती” व “नागकेशर” या कादंबऱ्या त्यासाठी प्रामुख्याने विचारात घेण्यात आल्या होत्या. १९९१ मध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या वाचनात “पानिपत” ही मराठी कादंबरी आली. या कादंबरीने श्री राव हे इतके प्रभावित झाले की त्यांनी तात्काळ या कादंबरीचा हिंदी अनुवाद भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत प्रकाशित केला. तेव्हा नरसिंह राव हे भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष होते. श्री पाटील यांच्या पानिपत, महानायक ,झाडाझडती ,लस्ट फाॅर लालबाग आधी कादंबऱ्यांनी मराठी मनावर गारुड घातले आहेच.


परंतु त्यांच्या अनेक कादंबऱ्या बहुतांशी सर्व भारतीय भाषांमध्ये व इंग्रजीतही प्रकाशित झाल्या असून त्याना अनेक आवृत्त्यांमध्ये प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले आहे. अलीकडेच श्री. पाटील यांनी लिहिलेल्या “अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान” या संशोधनात्मक वांडग्मयीन चरित्रग्रंथानेही वाचकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.
प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार व कवी श्री सुनील गंगोपाध्याय यांनी तर “महानायक” कादंबरीवर “देश “या प्रसिद्ध बंगाली नियतकालिकात एक स्वतंत्र लेख लिहून ह्या कादंबरीचा गौरव केला होता. गेली कित्येक वर्ष छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाने श्री. पाटील यांना भारून टाकले होते. शिवाय श्री पाटील यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या अनेक रसिक वाचकांकडून त्यांनी छत्रपती शिवरायांवर कादंबरी लिहावी असा सातत्याने पाठपुरावा केला होता. श्री.विश्वास पाटील यांनी गेल्या काही वर्षात स्वतः शिवरायांच्या महाराष्ट्रातील २४० किल्ल्यांना समक्ष त्या त्या स्थळी जाऊन भेटी दिल्या आहेत. तसेच कर्नाटक ,तामिळनाडू, आगरा, सुरत अशा अनेक ठिकाणी संशोधनासाठी त्यांनी भ्रमंती केली आहे. त्यांच्या “महासम्राट ” कादंबरीच्या दुसऱ्या खंडाचे नाव “रणखैंदळ” असून तोही ते लवकरच लिहून हातावेगळे करतील. शिवाय या पुढचे आणखी काही खंड येत्या काही वर्षात यथावकाश प्रकाशित होणार आहेत.

श्री. विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया….

भारतभरातील साहित्यिकांकडून माझी साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप ऋणी आहे! गेल्या 35 वर्षाहून अधिक काळ मी सातत्याने केलेले लेखन. मायमराठीची आचार्य अत्रे, खांडेकर अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी, कुसुमाग्रज ,वसंत कानेटकर यांच्या लेखनातून मला मिळालेली प्रेरणा व भारतभर सर्व भाषांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या, मास आणि क्लास या दोन्ही वर्गाला पसंत पडलेल्या माझ्या कादंबऱ्या या सगळ्याची पुण्याई या पाठीमागे आहे असे मला वाटते.

शरदचंद्र चटर्जी, शेक्सपियर, थॉमस हार्डी प्रेमचंद, काजी नजरुल इस्लाम इत्यादींपासून प्रेरणा घेऊन काही चार अक्षरे गिरवता आली, माझ्यासारख्या चौदाशे लोकवस्तीच्या खेड्यातून आलेल्या एका किसान पोरास अजून काय हवे !

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी माधव कौशिक यांची निवड; रंगनाथ पठारे यांचा पराभव

साहित्य क्षेत्रातील सगळ्यात प्रतिष्ठित संस्था मानली जाणारी साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज सकाळी पार पडली आहे. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी माधव कौशिक यांची निवड झाली आहे.
मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे हेदेखील रिंगणामध्ये होते. आधीच्या मराठी उमेदवरांपेक्षा पठारे यांनी अधिक प्रचार केला होता. पण अखेरीस त्यांचा पराभव झाला आहे. भारतीय भाषांचे संवर्धन करणाऱ्या साहित्य अकादमी या संस्थेची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली आहे. पण आतापर्यंत या अकादमीचा अध्यक्ष मराठी लेखक होऊ शकलेला नाही. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक झाली आहे. याआधी भालचंद्र नेमाडे आणि यावेळी रंगनाथ पठारे हे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर यात माधव कौशिक यांनी बाजी मारली आहे. पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साहित्य अकादमीच्या कार्यकारिणीच्या 97 सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख