संगमनेर उबाठा सेनेत बंडाळीची ठिणगी पडणार ?

0
1618

नाराज गटाने बोलवली बैठक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अंर्तगत बंडाळीने आधीच पक्षाची फाटाफूट झालेली असताना अजूनही ही फाटाफूट थांबलेली नाही. रोज अनेक ठिकाणी पक्षाची होणारी पडझड अजून थांबलेली नसताना संगमनेर शिवसेनेत देखील पुन्हा बंडाळीची ठिणगी पडण्याची शक्यता वाढली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच पक्षाने उत्तर नगर जिल्ह्यातील पक्षाच्या नवीन कार्यकारिणीची निवड केली होती. परंतु ही निवड करताना तत्कालीन पदाधिकार्‍यांना तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचे विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या व आपली नाराजी वरीष्ठ पातळीवर पोहचविण्यासाठी 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता येथील व्यापारी असोशीएशन हॉल येथे शिर्डी लोकसभेतील नाराज शिवसैनिकांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.


शिवसेना ठाकरे गटाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात नुकतीच संघटनात्मक फेररचना करण्यात आली. या फेरबदलात पक्षाचा कोणताही संघटनात्मक विचार न करता ठाकरे गटाच्या निष्ठावंत व पदाधिकारी, शिवसैनिकांना डावलण्यात आले. व्यक्तिगत खास असलेल्यांना स्थान देण्यात आले तर काही शिवसैनिकांना मुद्दाम या निवडीतून डावलण्यात आले आहे. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव येथील अनेक शिवसैनिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे तसेच संपर्क नेते संजय राऊत यांना व्यक्तीश: भेटून झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी हे शिवसैनिक एकवटणार आहेत. शिवसेनेला विखेसेना होण्यापासून वाचवायचे यासाठी प्रामाणिक पक्षनिष्ठ शिवसैनिकांना एकत्र आणायची वेळ आली आहे. पक्षात गद्दारी झाली, काहींनी शिंदे गटात जाण्याची धडपड केली तर काहींनी खासदार लोखंडे यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांना नवीन यादीत स्थान मिळाले आणि निष्ठावंत बाजूला राहिले. अशी भावना नाराज शिवसैनिकांची झाली आहे. संपर्कप्रमुखांसमोर खोटे चित्र सादर करण्यात येत असून सर्वांचा विचार करून पक्ष टिकवण्याचे काम सर्व शिवसैनिकांनी एकत्रपणे करावे यासाठी ही आढावा बैठक आयोजित केली असल्याचे बोलले जात आहे.


शिवसेनाला पक्षफुटीचे जनु ग्रहण लागले आहे. मोठमोठ्या नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला असून राज्यातही अनेक ठिकाणी रोज पक्षाची पडझड होत आहे. पक्ष कुणाचा व चिन्ह कुणाचे, सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याबाबतचाही अद्याप ठोस निर्णय झालेला नसतांना पक्षात मात्र निष्ठावंत, नाराज, दुखावलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. झालेल्या चुकांमधून कोणताही धडा पक्षश्रेष्ठी घेत नसल्याने राज्यभर अशा प्रकारची बंडाळी वाढतांना दिसत आहे. संगमनेरातही कार्यकर्ते नेमकी कोणत्या पक्षात, कोणत्या गटात कोणत्या नेत्याशी सलगी करतात याचा थांगपत्ता नसल्याने सामन्य शिवसैनिकही सैरभैर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here