निवृत्त न्यायाधिशांसमोर होणार सुनावणी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावात दलित समाजातील काही ग्रामस्थांच्या जागेचे क्षेत्र घटवून रेकॉर्डवर खोट्या नोंदी करण्यात आल्या आहेत. हे सर्व बेकायदेशीर प्रकार उघडकीस आणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल करावा अशी मागण्यात करण्यात आली. मात्र गुन्हा दाखल न केल्याने तक्रारदार दीपक नारायण वाघ यांनी थेट प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवल्याने ‘राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने’ या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह संगमनेरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावातील बाळासाहेब नारायण वाघ, दीपक नारायण वाघ, संदीप नारायण वाघ, वन्याबाई व भागुबाई नाना गायकवाड यांच्या गावठाण हद्दीमधील जागेच्या संदर्भातील हे प्रकरण असून या सर्व घोटाळ्याची तक्रार दीपक वाघ यांनी केली आहे. ग्रामपंचायत मिळकत मध्ये या जागेची नोंद असून त्यावर वरील नावांच्या नोंदी होत्या. मात्र अचानकपणे या जागांचे क्षेत्र घटवून त्या नोंदी गायब करण्यात आल्या असा आरोप करण्यात आला आहे. तर 1958 साली स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीचे 1994 पूर्वीचे ग्रामपंचायत नमुना नंबर 8 चे रजिस्टर ग्रामपंचायत दप्तरात आढळून येत नसल्याची माहिती वाघ यांनी दिली आहे. नोंदी असलेले रेकॉर्ड गहाळ झाले की गायब करण्यात आले याबाबत संशय व्यक्त होत आहे. दीपक वाघ यांनी यासंदर्भात उचित कागदपत्रे सादर करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती.
यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती, संगमनेर, विद्यमान गटविकास अधिकारी तसेच आर. एम. कासार विस्तार अधिकारी, राजेंद्र भाऊसाहेब गुंजाळ, सचिन अंबादास येमुल ग्रामसेवक, स्नेहल विजय भागवत ग्रामसेवक, मिरा मच्छिंद्र नन्नवरे माजी सरपंच, नवनाथ दगडू शिंदे माजी सरपंच, शिवनाथ बबन बोर्हाडे माजी उपसरपंच, तानाबाई मारुती गायकवाड, मारुती दादा गांडोळे, मंगल दामू चारोडे, अनिता गोकुळ वाळे, मंदा संजय गोरडे, शशिकांत गांडोळे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सर्व अशा 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि तक्रार अर्ज वाघ यांनी जिल्हाधिकार्यांसह पोलीस अधीक्षकांकडे तसेच संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तालुका पोलीस निरीक्षक यांच्याकडे केला होता. मात्र पोलिसांनी या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही. दीपक वाघ यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायत मधील सर्व नोंदींचे रेकॉर्ड मिळवले आहे.
तसेच आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत. काही कागदपत्रे गहाळ झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत कडून त्यांना देण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याने वाघ यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालय, नाशिक यांच्याकडे पोलीस अधीक्षक नगर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर, पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन संगमनेर आणि आय. ए. शेख पोलीस उपनिरीक्षक संगमनेर तालुका पोलीस ठाणे यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. सदर तक्रार पुढील उचित कारवाईसाठी राज्य तक्रार प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानुसार या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंड न्यायपिठा समोर ही सुनावणी ठेवली. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होत आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आणि पोलीस उपनिरीक्षक आय. ए. शेख यांना या प्रकरणी दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहावे असे आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यातील सायखिंडी येथे दलितांच्या जमिनीच्या नोंदीत फेरफार करून करण्यात आलेल्या या घोटाळ्यामुळे व त्याच्या सुरू झालेल्या चौकशीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या सुनावणीकडे आता अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.